Home Dhyeya News Special कर्तृत्वाला नेतृत्वाची नवी जबाबदारी; आर. एल. पाटील यांची श्री. गो.से. हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी...

कर्तृत्वाला नेतृत्वाची नवी जबाबदारी; आर. एल. पाटील यांची श्री. गो.से. हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी पदोन्नती

0
299

Loading

पाचोरा : शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची आणि विज्ञानाची जिज्ञासा निर्माण करणाऱ्या, प्रशासकीय जबाबदाऱ्या स्वीकारताना शिस्त व नियोजनाला प्राधान्य देणाऱ्या आणि सहकाऱ्यांशी माणुसकीचे नाते जपणाऱ्या आर. एल. पाटील यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला आता नेतृत्वाची नवी जबाबदारी लाभली आहे. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल, पाचोरा येथील उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील यांची विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यातील सातत्य, विद्यालयाविषयीची आस्था, शैक्षणिक योगदान आणि प्रशासकीय क्षमतेची संस्थेने घेतलेली ही दखल मानली जात आहे.
शाळेचे मुख्याध्यापकपद हे केवळ प्रशासकीय पद नसून संपूर्ण विद्यालयाला दिशा देणारे नेतृत्वाचे स्थान आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रतेसोबत निर्णयक्षमता, संघभावना, न्यायप्रियता, पारदर्शकता, शिस्त, संयमी स्वभाव आणि कोणामध्येही भेदभाव न करता सर्वांना एकजुटीने सोबत घेऊन पुढे जाण्याची वृत्ती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आर्थीक व्यवहारात पारदर्शकता व स्पष्टता आवश्यक असते. आर. एल. पाटील यांच्या आजवरच्या कार्याचा विचार करता या विविध गुणांचा प्रत्यय त्यांच्या सहकाऱ्यांना आणि संस्थेला सातत्याने आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सोपविणे हे त्यांच्या कार्याचा सन्मानच असल्याची भावना व्यक्त होत आहे.
विद्यालयातील मुख्याध्यापकपद रिक्त झाल्यानंतर संस्थेने विद्यालयातीलच उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील यांची या पदावर पदोन्नती केली. त्यांच्या नियुक्तीच्या निमित्ताने संस्थेचे चेअरमन नानासो. संजय वाघ, व्हा. चेअरमन नानासो. व्ही.टी. जोशी, शालेय समिती चेअरमन दादासो. खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन आण्णासो. वासुदेव महाजन तसेच संस्थेचे सन्माननीय संचालक यांच्या उपस्थितीत नवनियुक्त मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नानासो. संजय वाघ यांनी आपल्या मनोगतात आर. एल. पाटील यांच्या उपमुख्याध्यापकपदावरील उत्कृष्ट कामकाजाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विद्यालयाच्या कामकाजात त्यांनी दाखविलेली तत्परता, शाळेविषयी असलेली आस्था, जबाबदारी स्वीकारण्याची तयारी आणि शैक्षणिक कार्यातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्यावर मुख्याध्यापकपदाची धुरा सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नव्या जबाबदारीतही ते विद्यालयाच्या प्रगतीसाठी प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
आर. एल. पाटील यांचा सेवाप्रवास तब्बल २६ वर्षांचा आहे. १ जुलै २००० रोजी श्री. गो.से. हायस्कूल, पाचोरा येथे उपशिक्षक म्हणून त्यांनी आपल्या सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर १ जुलै २०१९ रोजी पर्यवेक्षकपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. १ जुलै २०२४ रोजी त्यांची उपमुख्याध्यापकपदी नियुक्ती झाली आणि आता १ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांनी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. एका शिक्षकापासून सुरू झालेला हा प्रवास नेतृत्वाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.
M.Sc., B.Ed. अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या आर. एल. पाटील यांनी विज्ञान शिक्षक म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनियर, तहसीलदार, प्रांत अधिकारी यांसह विविध उच्च पदांवर पोहोचून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देत त्यांनी विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय सहभागाची संधी मिळवून दिली.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि शिस्तप्रियता. संस्थेच्या किंवा विद्यालयाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता असावी, प्रत्येक बाब स्पष्ट आणि नियमबद्ध पद्धतीने हाताळली जावी, याला ते महत्त्व देतात. उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर, जबाबदारीची जाणीव आणि व्यवहारातील स्वच्छता ही त्यांच्या कामकाजाची वैशिष्ट्ये मानली जातात.
शिस्तीबाबतही त्यांची भूमिका स्पष्ट आणि संतुलित आहे. शिस्त म्हणजे केवळ नियमांची अंमलबजावणी नव्हे, तर प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. स्वतः शिस्त पाळून इतरांसमोर उदाहरण ठेवणे आणि विद्यालयात सकारात्मक शिस्तीचे वातावरण निर्माण करणे, याला ते प्राधान्य देतात.
कर्मचाऱ्यांशी वागताना मनात कोणतीही कटुता न ठेवता सर्वांना समान वागणूक देणे, मतभेदांना वैयक्तिक स्वरूप न देता संवादातून मार्ग काढणे आणि व्यक्तीपेक्षा कामाला महत्त्व देणे, ही त्यांच्या कार्यशैलीतील विशेष जमेची बाजू मानली जाते. शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी कोणत्याही स्तरावरील असो, त्यांच्याशी आदराने संवाद साधून त्यांचे म्हणणे समजून घेण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. त्यामुळे सहकाऱ्यांमध्ये विश्वासाचे आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करण्यास त्यांना यश आले आहे.
शैक्षणिक क्षेत्रासोबतच संघटनात्मक आणि सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. ते तालुकाध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघ, पाचोरा तसेच तालुकाध्यक्ष TDF संघटना, पाचोरा म्हणून कार्यरत आहेत. श्री. गो.से. हायस्कूल कर्मचारी पतपेढी लिमिटेड या पतपेढीचे सचिव म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत. पाचोरा-भडगाव तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक कार्यात त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग राहिला आहे.
मुख्याध्यापक म्हणून आता त्यांच्यासमोर विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्याचे मोठे आव्हान आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शिक्षकांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पालकांशी सुसंवाद, शिस्तबद्ध व सकारात्मक शालेय वातावरण आणि विविध नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम यासाठी त्यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सर्वांना सोबत घेऊन, नियम व शिस्तीच्या चौकटीत पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण कामकाज ही त्यांची कार्यपद्धती विद्यालयाच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक आण्णासो. दगाजी वाघ, आप्पासो. सतीश चौधरी, दादासो. योगेश पाटील, बापूसो. प्रकाश पाटील, दादासो. अर्जुनदास पंजाबी, अण्णासाहेब मधुकर पाटील, आबासो. एकनाथ महालपुरे, नगरसेवक सुरज वाघ उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष भाऊसो. दिलीप वाघ, चेअरमन नानासो. संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेशदादा देशमुख, व्हाइस चेअरमन नानासो. व्ही.टी. जोशी, शालेय समिती चेअरमन दादासो. खलिल देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन आण्णासो. वासुदेव महाजन तसेच संस्थेच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाने आर. एल. पाटील यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर आर. एल. पाटील यांनी संस्थेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि संस्थेच्या सहकार्याने विद्यालयाची शैक्षणिक व सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी आपल्या आभारपर मनोगतात व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना घडविणारा शिक्षक, जबाबदारीला न्याय देणारा प्रशासक, आर्थिक व्यवहारात पारदर्शकतेला प्राधान्य देणारा व्यक्ती, कर्मचाऱ्यांशी मनात कोणतीही कटुता न ठेवता समानतेची भूमिका घेणारा सहृदय सहकारी आणि शिस्तीला महत्त्व देणारे नेतृत्वकर्ते म्हणून आर. एल. पाटील यांची नवी भूमिका श्री. गो.से. हायस्कूलच्या पुढील वाटचालीसाठी निश्चितच आशादायी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!