Home Dhyeya News Special अमळनेर येथे सव्वातीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी काँग्रेसचा थेट कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या!

अमळनेर येथे सव्वातीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी काँग्रेसचा थेट कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या!

0
5

Loading

अमळनेर – अवघ्या सव्वातीन किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या सहा-सात महिन्यांपासून रखडलेले असताना संबंधित विभागाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमळनेर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली. कार्यकारी अभियंता कार्यालयात उपस्थित नसल्याचे समोर आल्यानंतर संतप्त पदाधिकाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्या दालनातच अचानक ठिय्या आंदोलन सुरू केले.
पिंप्री ते पिंपळेसीम या मार्गाचे डांबरीकरण रखडल्यामुळे धरणगाव तालुक्यातील सुमारे २५ ते ३० गावांमधील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या या मार्गावर खडीचा खडबडीत पृष्ठभाग असल्याने दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनचालकांना सततच्या धक्क्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांच्या शरीरावरही या प्रवासाचा विपरीत परिणाम होत असून वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.
या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धरणगाव येथील कार्यालयाचे वारंवार लक्ष वेधण्यात आले होते. मात्र आश्वासनांपलीकडे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला.
या ठिय्या आंदोलनात धरणगाव शहर काँग्रेसचे नेते सुनील सोनार आणि धरणगाव तालुका काँग्रेसचे नेते शेख बशीर सहभागी झाले. आंदोलनाची माहिती मिळताच अमळनेर काँग्रेसचे नेते संदीप घोरपडे, अमळनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, अमळनेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भागवत गुरुजी तसेच अमळनेर तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष राजू भाट यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनीही पूर्ण वेळ आंदोलनात सहभागी होत या मागणीला पाठिंबा दिला.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ तोंडी आश्वासन देण्याचा प्रयत्न होत असताना आंदोलकांनी भूमिका स्पष्ट केली. “लेखी पत्र मिळाल्याशिवाय येथून उठणार नाही,” असा ठाम पवित्रा घेतल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली.
यानंतर अमळनेर येथील उपकार्यकारी अभियंत्यांनी धरणगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून पिंप्री-पिंपळेसीम रस्त्याच्या कामाबाबत माहिती घेतली. काम लवकर पूर्ण करण्याबाबतचे लेखी आश्वासनाचे पत्र आंदोलकांना देण्यात आल्यानंतरच ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
अवघ्या सव्वातीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी नागरिकांना महिनोन्महिने हालअपेष्टा सहन कराव्या लागणे ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आता लेखी आश्वासनानुसार प्रत्यक्ष काम कधी सुरू होते, याकडे धरणगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!