भडगाव – येथील वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरोधात भडगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन आंदोलनाचा ईशारा देण्यात आला.
मागील एक ते दीड महिन्यापासून भडगाव शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नुकत्याच सुरू झालेला व्यापार,व्यवसाय, नागरिकांचे दैनंदिन व शासकीय कामांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असून वीजेवर अवलंबून उपकरणांना क्षती पोहोचत आहे. खंडित व कमी दाबाच्या वीज पुरवठयामुळे भडगाव नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेतील इलेक्ट्रिक मोटारी जळाल्याने ऐन पावसाळ्यात नदीला पाणी असूनही सुरळीत पाणी पुरवठा करता येत नाही.
अवाजवी वीजबिलांमुळे नागरिकांना मनस्ताप होत असून त्यांच्या तक्रारीचे निरसन होत नाही तोपर्यंत कोणत्याही ग्राहकाचे कनेक्शन खंडित करण्यात येऊ नये. केंद्र शासनाच्या आय.पी. डि.एस. योजनेअंतर्गत बसविण्यात आलेले ट्रान्सफॉर्मर त्वरित सुरू करण्यात यावे. वरील समस्या १० दिवसांच्या आत न सोडविल्यास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता भडगाव यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, सरचिटणीस अनिल पाटील, बन्सीलाल परदेशी, प्रदिप सोमवंशी इ. उपस्थित होते.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.