Home Dhyeya News Special प्रितमसिंग पाटील यांची उपमुख्याध्यापकपदी पदोन्नती; २८ वर्षांच्या शिक्षणसेवेचा गौरव

प्रितमसिंग पाटील यांची उपमुख्याध्यापकपदी पदोन्नती; २८ वर्षांच्या शिक्षणसेवेचा गौरव

0
358

Loading

पाचोरा : प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षणाची वाटचाल सुरू करून अध्यापन क्षेत्रात तब्बल २८ वर्षे ज्ञानदानाचे कार्य करणारे प्रितमसिंग मधुकर पाटील यांची १ सप्टेंबर २०२६ पासून श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे उपमुख्याध्यापकपदी पदोन्नती झाली आहे. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला मिळालेली ही पदोन्नती त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शैक्षणिक अनुभव आणि कार्यक्षमतेचा गौरव करणारी ठरली आहे. पी.टी.सी.चे ज्येष्ठ संचालक मधुकर सांडू पाटील यांचे चिरंजीव असलेल्या प्रितमसिंग पाटील यांनी एम.ए., बी.एड. (मराठी) हे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात डोकलखेडा येथील जि.प. प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर पाचवी ते सातवीचे हायस्कूल शिक्षण श्री.गो.से. हायस्कूल येथे, तर आठवी ते दहावीचे शिक्षण दहिगाव संत येथे पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना त्यांचे छोटे काका बाळकृष्ण सांडू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. एम.एम. महाविद्यालय, पाचोरा येथे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले, तर बी.एड.चे शिक्षण चोपडा येथे घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर १५ जून १९९८ रोजी संस्थेने चालविलेल्या दहिगाव संत येथील विनाअनुदानित शाळेत त्यांची पहिली नियुक्ती झाली. अध्यापन क्षेत्रातील या पहिल्या संधीपासूनच त्यांनी आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण करण्यास सुरुवात केली. सन १९९९ मध्ये माहेजी येथे त्यांनी अर्धवेळ शिक्षक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर १ जुलै २००० पासून त्यांची कायमस्वरूपी पूर्णवेळ उपशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. सन २००० ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे उपशिक्षक म्हणून त्यांनी सातत्याने कार्य केले. विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देतानाच त्यांच्यामध्ये शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. अध्यापनाच्या अनुभवातून विद्यार्थ्यांशी निर्माण झालेले आत्मीय नाते आणि शैक्षणिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव ही त्यांच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात. आता उपमुख्याध्यापकपदाची नवी जबाबदारी स्वीकारताना त्यांच्या अनुभवाचा उपयोग शाळेच्या शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामकाजाला निश्चितच होणार आहे. प्रितमसिंग पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या वडिलांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील कार्याचा मोठा प्रभाव आहे. मधुकर सांडू पाटील यांनी डोकलखेडा येथील विविध कार्यकारी सोसायटीचे तब्बल पंधरा वर्षे चेअरमन म्हणून कार्य केले आहे. वाघुलखेडा येथे दहा वर्षे ते बिनविरोध सरपंच राहिले. शेतकरी सह संघाच्या संचालकपदाची पाच वर्षे त्यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच पाचोरा तालुका कापूस उत्पादक सोसायटीचे वीस वर्षे संचालक आणि त्यापैकी पाच वर्षे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी कार्य केले आहे. मागील १८ ते २० वर्षांपासून ते पी.टी.सी.चे संचालक असून दहिगाव संत हायस्कूलच्या स्कूल कमिटीचे चेअरमन म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. विशेष म्हणजे स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार वाघ यांचे ते सदैव खंदे समर्थक राहिले आहेत. सामाजिक आणि संस्थात्मक कार्याची ही समृद्ध पार्श्वभूमी प्रितमसिंग पाटील यांच्या जडणघडणीतही महत्त्वपूर्ण ठरली आहे. कुटुंबातील शैक्षणिक परंपराही उल्लेखनीय असून त्यांच्या एका भावाने हायस्कूल टीचर म्हणून शिक्षण क्षेत्रात योगदान दिले आहे, तर सर्वात लहान भाऊ शेतीची जबाबदारी सांभाळत आहे. डोकलखेडा येथील प्राथमिक शिक्षणापासून सुरू झालेला प्रितमसिंग पाटील यांचा शैक्षणिक प्रवास, दहिगाव संत येथील पहिली नियुक्ती, माहेजी येथील अध्यापन आणि त्यानंतर श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथील प्रदीर्घ सेवा असा टप्प्याटप्प्याने पुढे जात आता उपमुख्याध्यापकपदापर्यंत पोहोचला आहे. पदोन्नतीनंतर त्यांच्या खांद्यावर शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच प्रशासकीय जबाबदाऱ्याही येणार आहेत. त्यांच्या दीर्घ अनुभवातून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि संस्थेला निश्चितच लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रितमसिंग पाटील त्यांच्या नियुक्तीच्या निमित्ताने संस्थेचे चेअरमन नानासो. संजय वाघ, व्हा. चेअरमन नानासो. व्ही.टी. जोशी, शालेय समिती चेअरमन दादासो. खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन आण्णासो. वासुदेव महाजन तसेच संस्थेचे सन्माननीय संचालक यांच्या उपस्थितीत नवनियुक्त उपमुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला. या उल्लेखनीय पदोन्नतीबद्दल ‘झुंज’ वृत्तपत्र आणि ‘ध्येय न्यूज’चे संपादक संदीप दा. महाजन यांच्यातर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, उपमुख्याध्यापक म्हणून त्यांच्या पुढील शैक्षणिक व प्रशासकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला आणि शैक्षणिक गुणवत्तेला अधिक बळ मिळो, हीच सदिच्छा. त्यांच्या पदोन्नतीबद्दल शिक्षण क्षेत्रातील सहकारी, विद्यार्थी, पालक, मित्रपरिवार तसेच डोकलखेडा, पाचोरा आणि परिसरातील नागरिकांकडूनही अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!