Home Dhyeya News Special दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा; भडगावात ॲलिम्को मोजमाप शिबिरात १५४ विद्यार्थ्यांचा सहभाग

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा; भडगावात ॲलिम्को मोजमाप शिबिरात १५४ विद्यार्थ्यांचा सहभाग

0
72

Loading

भडगाव : दिव्यांगत्वामुळे शिक्षणाच्या वाटचालीत कोणत्याही विद्यार्थ्याची पावले थांबू नयेत, त्याला आवश्यक साधनांची साथ मिळावी आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून तो पुढे जावा, या संवेदनशील उद्देशातून आदर्श कन्या विद्यालय, भडगाव येथे दि. 03 सप्टेंबर 2026 रोजी ॲलिम्को कार्यात्मक मोजमाप शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत पंचायत समिती भडगाव, चाळीसगाव व पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला तीनही तालुक्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद जळगावचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निलेश पाटील यांच्या नियोजनानुसार व मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शारीरिक गरजा लक्षात घेऊन त्यांना भविष्यात आवश्यक ठरणारी सहाय्यभूत साधने व उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी मोजमाप व आवश्यक तपासणी करण्यात आली. ॲलिम्कोच्या तज्ज्ञ पथकाने प्रत्येक विद्यार्थ्याची गरज समजून घेत कार्यात्मक मोजमाप नोंदविले. त्यामुळे एखाद्या उपकरणाची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्याला त्याच्या शारीरिक परिस्थितीनुसार योग्य साधन मिळण्याच्या प्रक्रियेला या शिबिरातून महत्त्वपूर्ण सुरुवात झाली. या प्रसंगी पंचायत समिती भडगावचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, गटशिक्षणाधिकारी पाचोरा विजय पवार तसेच जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण, जि. प. जळगाव राहुल चौधरी उपस्थित होते. याशिवाय भडगाव, चाळीसगाव व पाचोरा तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थी, त्यांचे पालक, तीनही तालुक्यांतील तालुका समन्वयक समावेशित शिक्षण तसेच केंद्रस्तरावर नियोजित कामकाज करणारे विशेष शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी विजय पवार यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे सांगितले. योग्य वेळी मिळणारे मार्गदर्शन, आवश्यक साधने आणि सकारात्मक वातावरण यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळ मिळते आणि त्यांच्या सुप्त क्षमतांना योग्य दिशा मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. रावसाहेब पाटील यांनीही दिव्यांग विद्यार्थ्यांकडे सहानुभूतीपेक्षा त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना सक्षम करण्याची गरज अधोरेखित केली. योग्य संधी मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी आपल्या कर्तृत्वाची नवी उंची गाठू शकतो, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला. शिबिरात भडगाव तालुक्यातील 36, चाळीसगाव तालुक्यातील 35 आणि पाचोरा तालुक्यातील 83 अशा एकूण 154 दिव्यांग विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यात आली. विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांसाठीही हा अनुभव आश्वासक ठरला. आपल्या मुलांच्या गरजा तज्ज्ञांकडून जाणून घेऊन त्यानुसार सहाय्य मिळण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आशेचे भाव दिसून आले. या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना केवळ उपकरणांची मदत नव्हे, तर शिक्षण, आत्मविश्वास, स्वावलंबन आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेल्या संधींची दारे अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न झाला. या कार्यात डॉ. अमितकुमार सिंह, डॉ. सोनिकुमारी, डॉ. सुशिल सिंह आणि डॉ. मयुर वर्मा यांच्या तज्ञ डॉक्टर टीमने महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आत्मविश्वास आणि पालकांच्या मनात निर्माण झालेली आशा हेच या उपक्रमाचे खरे यश म्हणावे लागेल. 154 विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांना सक्षमतेच्या दिशेने पुढे नेणारे हे शिबिर समावेशक शिक्षणाच्या वाटचालीतील निश्चितच एक उल्लेखनीय आणि माणुसकी जपणारे पाऊल ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!