Home Dhyeya News Special इंग्रजी शब्दांवरील प्रभुत्वाची रंगली चुरस; सारोळा बुद्रुक केंद्रस्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांचा...

इंग्रजी शब्दांवरील प्रभुत्वाची रंगली चुरस; सारोळा बुद्रुक केंद्रस्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
30

Loading

सारोळा बुद्रुक : इंग्रजी भाषेतील शब्दांचे अचूक स्पेलिंग, उच्चार आणि लेखनकौशल्य विकसित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या गुणवत्तेची प्रभावी छाप पाडली. जिल्हा परिषद जळगाव व ओपन लिंक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा तालुक्यातील सारोळा केंद्रासाठी दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा सारोळा बुद्रुक येथे ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांचा इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे, भाषेचा आत्मविश्वास निर्माण करणे तसेच अचूक शब्दलेखनाची सवय लागावी, या शैक्षणिक हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळा स्तरावर विजेते ठरलेल्या केंद्रातील २० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. इयत्ता १ ली व २ री, इयत्ता ३ री व ४ थी आणि इयत्ता ५ वी व ६ वी अशा तीन गटांमध्ये विद्यार्थ्यांनी कौशल्याची परीक्षा दिली. प्रत्येक गटात रंगलेल्या चुरशीच्या सामन्यामुळे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक सरोज गायकवाड, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाचोळे, विषय साधन व्यक्ती गिरीश भोयर, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक विनोद धनगर तसेच केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. गट क्र. १ मध्ये जि. प. शाळा, तारखेडा बु. येथील तनुजा समाधान पाटील हिने प्रथम, तर जि. प. शाळा, सारोळा बु. येथील दिवेश दादाभाऊ चंदनशिव याने द्वितीय क्रमांक मिळविला. गट क्र. २ मध्ये जि. प. शाळा, तारखेडा बु. येथील हेमांगिनी दीपक पाटील हिने प्रथम, तर जि. प. शाळा, सारोळा बु. येथील समर्थ चंद्रकांत पाटील याने द्वितीय क्रमांक पटकावला. गट क्र. ३ मध्ये जि. प. शाळा, डोंगरगाव येथील पल्लवी दिनेश पाटील हिने प्रथम, तर जि. प. शाळा, सारोळा बु. येथील प्रथमेश अशोक पाटील याने द्वितीय क्रमांक संपादन केला. विजेत्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि प्रोत्साहनाची भूमिका महत्त्वाची ठरली. स्पर्धेच्या नियोजनासाठी केंद्र शाळेतील शिक्षक राजाराम राठोड व वैशाली चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतेला व्यासपीठ देणारा हा उपक्रम त्यांच्या आत्मविश्वासाला चालना देणारा ठरला असून, अशा स्पर्धांमुळे शालेय शिक्षण अधिक आनंददायी, कृतीशील आणि गुणवत्तापूर्ण होण्यास निश्चितच मदत होत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!