Home Dhyeya News Special “राजकारणाच्या रणांगणात विचारांची नवी मशाल, नेतृत्वाच्या केंद्रस्थानी राहुल गांधींची चाल; संघटन मजबूत...

“राजकारणाच्या रणांगणात विचारांची नवी मशाल, नेतृत्वाच्या केंद्रस्थानी राहुल गांधींची चाल; संघटन मजबूत करण्याचा घेतला निर्धार, नाशिकच्या शिबिरातून काँग्रेसचा नव्या वाटचालीचा हुंकार!”

0
47

Loading

नाशिक – महाराष्ट्र प्रदेश बदलत्या राजकीय परिस्थितीत संघटन अधिक सक्षम करण्यासाठी काँग्रेसने नाशिकमध्ये घेतलेल्या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराला राष्ट्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र व मुंबईतील काँग्रेस जिल्हाध्यक्षांसाठी संघटन सृजन अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा समारोप नाशिक येथील एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट येथे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. महाराष्ट्रातील आणि मुंबईतील सुमारे 80 जिल्हाध्यक्षांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. संघटनात्मक बांधणीपासून देशातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीपर्यंत विविध विषयांवर या कालावधीत मार्गदर्शन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण उपक्रमात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.अविनाश भालेराव सहभागी झाले होते. जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनात्मक जबाबदारी पार पाडताना पक्षाच्या व्यापक कार्यपद्धतीचा आणि बदलत्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास करण्याची संधी या प्रशिक्षणातून मिळाल्याचे महत्त्व या सहभागाला प्राप्त झाले. मात्र, या संपूर्ण कार्यक्रमातील भालेराव परिवारासाठी सर्वाधिक आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण ठरला तो राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या विशेष भेटीचा. समारोपाच्या कार्यक्रमावेळी ॲड. अविनाश भालेराव यांनी आपल्या परिवारासह राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी भालेराव परिवारातील दोन्ही मुले तनिष्क व अर्णव यांच्याशी विशेष आपुलकीने संवाद साधला. त्यांच्या आवडी-निवडी, विचार आणि भविष्यातील वाटचालीविषयी राहुल गांधी यांनी सखोल चर्चा केली. राष्ट्रीय पातळीवरील एका प्रमुख नेत्याशी आपल्या मुलांना इतक्या जवळून संवाद साधण्याची संधी मिळणे, हा भालेराव परिवारासाठी निश्चितच अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला. राजकीय कार्यक्रमातील औपचारिकतेपलीकडे जाऊन राहुल गांधी यांनी मुलांशी साधलेला हा संवाद उपस्थितांसाठीही लक्षवेधी ठरला.
“नेता तोच, जो जनमनाशी नाते जोडतो;
विचार तोच, जो नव्या पिढीला दिशा देतो!”
या भावनेची अनुभूती या भेटीतून मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. दहा दिवसीय प्रशिक्षणाच्या माध्यमातून काँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेतृत्वाला संघटन अधिक प्रभावी करण्यासाठी विविध अंगांनी तयार करण्यात आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली होती. देशातील सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थिती, आंतरराष्ट्रीय घडामोडी, वर्तमान राजकीय आव्हाने, संघटनात्मक विस्तार, कार्यकर्त्यांशी संवाद आणि जनतेच्या प्रश्नांशी पक्षाला अधिक प्रभावीपणे जोडण्याच्या विविध पद्धतींवर देशातील विविध विषयांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणातून मिळालेले विचार, अनुभव आणि कार्यपद्धती जिल्ह्याच्या पातळीवर प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी आता सहभागी जिल्हाध्यक्षांवर राहणार आहे. समारोप कार्यक्रमाला सरचिटणीस वामसी रेड्डी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्राचे प्रभारी बी. एम. संदीप, काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार नानाभाऊ पटोले, प्रशिक्षणाचे प्रमुख अरुण शर्मा यांच्यासह विविध विषयांतील तज्ज्ञ उपस्थित होते. राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले. संघटनात्मक पुनर्बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि नव्या पिढीला पक्षाच्या विचारप्रवाहाशी जोडण्याच्या दृष्टीने या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. नाशिकमधील या दहा दिवसांच्या प्रशिक्षणातून काँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेतृत्वाला नव्या दृष्टिकोनाची जोड मिळाली असून, आगामी काळात त्याचे प्रतिबिंब संघटनात्मक कामकाजात उमटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यातच राहुल गांधी यांच्यासोबत एडवोकेट अविनाश भालेराव यांच्या परिवाराची झालेली आत्मीय भेट या संपूर्ण शिबिराच्या आठवणींना एक वेगळीच भावनिक किनार देणारी ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!