![]()
पाचोरा – शिक्षकाच्या भूमिकेत एक दिवस वावरताना अध्यापनासोबतच शिस्त, नियोजन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली जबाबदारी अनुभवण्याची संधी दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळाली. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारत हा अनुभव घेतला. या उपक्रमामुळे विद्यालयातील वातावरणात उत्साह निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांप्रती आदर आणि कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एल.पाटील होते. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून मनोगत व्यक्त केले. शिक्षकांकडून मिळणारे ज्ञान, संस्कार, मार्गदर्शन आणि जीवनातील योग्य-अयोग्याची जाणीव यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
या विशेष उपक्रमात दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारून वर्गातील शैक्षणिक कामकाजात सहभाग घेतला. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसमोर विषय मांडताना येणारी जबाबदारी, प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल अशा पद्धतीने शिकविण्याची गरज आणि वर्गातील शिस्त सांभाळण्याचे कौशल्य याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना मिळाला. त्यामुळे शिक्षकांचे दैनंदिन कार्य हे केवळ अध्यापनापुरते मर्यादित नसून त्यामागे सातत्यपूर्ण मेहनत, संयम आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी असते, याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी कु. विधी पाटील व कु. मानसी पाटील यांनी केले. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मनोहर देसले यांनी मार्गदर्शन करताना शिक्षकाचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्थान आणि शिक्षणासोबत संस्कार घडविण्यातील गुरूंची भूमिका याबाबत विचार मांडले. शिक्षक दिन हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाचे स्मरण करण्याचा दिवस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक आर.एल.पाटील यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि जबाबदारीची भावना विकसित होते. शिक्षकाची भूमिका साकारल्यामुळे विद्यार्थ्यांना गुरूंच्या कार्यातील बारकावे समजण्यास मदत झाली असून, हा अनुभव त्यांच्या शैक्षणिक प्रवासात निश्चितच उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप इयत्ता आठवी ‘क’चा विद्यार्थी अकबर शहा फकीर याच्या आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रद्धा भावेश पाटील व प्रज्ञा धुडकू सावळे या शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक आर.बी बांठिया, एम. टी. कौंडिण्य, बी. एस. पाटील, ए.व्ही पाटील, एस. पी. सूर्यवंशी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या शिक्षकांच्या भूमिकेमुळे गुरूंच्या कार्याची जाणीव तर झालीच, शिवाय शिक्षक-विद्यार्थी नात्यातील आदर, विश्वास आणि कृतज्ञतेचे महत्त्वही या उपक्रमातून अधोरेखित झाले.



































