Home Dhyeya News Special राजकीय रंगमंचाचा रिंग मास्टर! जळगावच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या सुरेशदादा जैन यांच्या पर्वाची...

राजकीय रंगमंचाचा रिंग मास्टर! जळगावच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या सुरेशदादा जैन यांच्या पर्वाची आठवण आणि आजच्या राजकीय पिढीसमोर उभा राहिलेला आरसा

0
33

Loading

पाचोरा – कधीकाळी जळगाव शहरातील एक बंगला हा केवळ वास्तू नव्हता; तो जिल्ह्याच्या राजकीय हालचालींचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू होता. त्या बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकींच्या रांगा, भेटीसाठी आतुरलेल्या कार्यकर्त्यांची लगबग आणि विविध प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांची सततची वर्दळ—हे दृश्य एका प्रभावशाली राजकीय पर्वाची साक्ष देत होते. त्या काळातील हे राजकीय केंद्र म्हणजे सुरेशदादा जैन यांचे निवासस्थान. जळगावच्या राजकारणात सुरेशदादा जैन यांचे नाव केवळ एका राजकीय नेत्याच्या चौकटीत बसणारे नाही. मुत्सद्देगिरी, राजकीय गणिताची जाण, संघटन कौशल्य आणि निर्णयक्षमतेच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. जळगाव शहराच्या विकासाच्या प्रक्रियेतही त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा मोठा प्रभाव राहिला.
सुरेशदादा जैन यांच्या राजकीय प्रभावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या संपर्काचे व्यापक वर्तुळ. धर्म, जात, पंथ, व्यवसाय किंवा सामाजिक स्तर यांचा विचार न करता विविध घटकांतील लोक त्यांच्या संपर्कात येत होते. एखाद्याची अडचण वैयक्तिक असो, सामाजिक असो किंवा राजकीय—मदतीची अपेक्षा घेऊन त्यांच्या दारात आलेल्या व्यक्तीला काहीतरी मार्ग मिळतो, अशी त्या काळात धारणा निर्माण झाली होती. याच कारणामुळे त्यांच्या भोवती केवळ राजकीय कार्यकर्त्यांची नव्हे, तर विविध क्षेत्रांतील व्यक्तींची मोठी गर्दी निर्माण झाली होती. काहींसाठी ते राजकीय मार्गदर्शक होते, काहींसाठी आधारवड आणि काहींसाठी तर जन्मदात्या वडिलांपेक्षाही मोठे व्यक्तिमत्त्व झाले होते.
मात्र या प्रभावामागे आणखी एक महत्त्वाचा पैलू होता—दुसऱ्यांना उभे करण्याची आणि संधी देण्याची राजकीय शैली. राजकारणात एखाद्या व्यक्तीला संधी मिळणे म्हणजे केवळ पद मिळणे नव्हे; ती व्यक्ती समाजात उभी राहण्याची प्रक्रिया असते. सुरेशदादा जैन यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहताना अशा अनेक व्यक्तींची उदाहरणे चर्चेत येतात, ज्यांना त्यांच्या राजकीय आश्रयातून पुढे जाण्याची संधी मिळाली. काही जणांची सुरुवात अत्यंत सामान्य पातळीवरून झाली. काहींची सामाजिक किंवा राजकीय प्रतिमा त्या काळात फारशी प्रभावी नव्हती. काही व्यक्तींविषयी तर त्यांच्या भूतकाळामुळे गंभीर चर्चा आणि आरोपही होत असत. स्पष्टच बोलायचे झाले तर काहींची लायकी गावाच्या उकीरड्यावर बसण्याची नव्हती ज्यांचे नाव गुन्हेगारी क्षेत्रात अग्रक्रमावर होते अशा लोकांना सुरेश दादांनी विशेष आशीर्वाद देऊन गाडी बंगले लक्झरी केबिन नको ते वैभव प्राप्त करून दिले
सुरेशदादांच्या राजकीय छत्रछायेत आल्यावर यापैकी काहींच्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याचे जळगावच्या राजकीय वर्तुळाने पाहिले. ज्यांची राजकीय किंवा सामाजिक ओळख अत्यंत मर्यादित होती, अशा काही व्यक्तींना संधी, प्रतिष्ठा आणि पुढे जाण्याची दारे खुली झाली. गाड्या, बंगले, आलिशान कार्यालये आणि राजकीय वैभवापर्यंतचा प्रवास काहींच्या बाबतीत घडला या परिवर्तनाला केवळ जळगाव जिल्हाच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळानेही जवळून पाहिले आहे.
मात्र या सगळ्या चित्राकडे पाहताना एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो—ही राजकीय ताकद त्यांनी स्वतःचे साम्राज्य उभे करण्यासाठी वापरली की इतरांना उभे करण्यासाठी? सुरेशदादा जैन यांनी नेमके काय केले, काय केले नाही आणि कोणासाठी केले, याची संपूर्ण अंतर्गत कहाणी कदाचित त्यांनाच माहीत असेल. राजकारणात कोण पूर्णपणे धुतल्या तांदळासारखा आहे, हा प्रश्नच मुळात गुंतागुंतीचा आहे. प्रत्येक नेत्याच्या निर्णयांवर, व्यवहारांवर आणि राजकीय भूमिकांवर इतिहास कधीतरी प्रश्न उपस्थित करतो. मात्र एखाद्या व्यक्तीने आपल्या राजकीय प्रभावाचा मोठा भाग इतरांना घडवण्यासाठी वापरला का, हा स्वतंत्रपणे विचार करण्याचा विषय आहे.
विशेष म्हणजे, इतक्या प्रदीर्घ राजकीय प्रवासानंतरही आपल्या वैयक्तिक चारित्र्यावर डाग लागू न देण्याचा दावा हा त्यांच्या प्रतिमेतील महत्त्वाचा पैलू मानला जातो. राजकारणात सत्ता टिकवणे अवघड असते; परंतु सत्ता गेल्यानंतरही स्वतःची ओळख टिकवणे त्याहून कठीण असते.
राजकारणाचे गणित बदलले की कालची समीकरणे उद्याच्या वास्तवात राहत नाहीत. ज्यांच्या एका शब्दाला गावाच्या ग्रामपंचायतीच्या गल्लीपासून ते दिल्लीच्या संसदेपर्यंत कधीकाळी प्रचंड वजन होते आज वेळ आल्यावर राजकीय बुद्धिबळावरच्या पटलावरील गणिते बदलल्यानंतर सभोवतीची गर्दी नंतर दुर होते. कालपर्यंत जवळ असलेले लोक अंतर ठेवतात. काही जण पूर्वीच्या संबंधांपासून स्वतःला वेगळे दाखवू लागतात. याच टप्प्यावर निष्ठा आणि स्वार्थ यांच्यातील फरक स्पष्ट होतो.
कधीकाळी ज्यांच्या बंगल्याबाहेर वाहनांच्या रांगा लागत होत्या, तिथे नंतर शांतता निर्माण झाली, ही केवळ एका व्यक्तीची कथा नाही; ती सत्तेभोवती फिरणाऱ्या राजकीय समाजमानाची कथा आहे. कधीकाळी एखाद्या व्यक्तीच्या एका इशाऱ्यावर धावणारे राजकीय – शासकीय सहकारी परिस्थिती बदलताच दूर जातात, हे राजकारणातील कटू वास्तव आहे. म्हणूनच आजच्या राजकीय पिढीने या घटनांकडे केवळ व्यक्तिनिष्ठ दृष्टीने नव्हे, तर राजकीय संस्कृतीच्या आरशातून पाहण्याची गरज आहे.
शिक्षक दिन नुकताच पार पडला. शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या असंख्य पोस्ट सोशल मीडियावर झळकल्या. शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण राजकीय जीवनात ज्यांनी अनेकांना घडवले, राजकारणाचे डावपेच शिकवले, संघटन उभे करण्याची पद्धत समजावली आणि सत्तेच्या गलियार्‍यात चालण्याची दिशा दाखवली, अशा राजकीय गुरुंची आठवण किती जणांनी केली? हीच या संपूर्ण कथेमधील सर्वात मोठी विसंगती आहे.
ज्यांच्याकडून राजकीय विद्यार्थी कधीकाळी शिकले, मार्गदर्शन घेतले आणि ज्यांच्या प्रभावाच्या सावलीत स्वतःची राजकीय ओळख निर्माण केली, त्यांपैकी कितीजणांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्या राजकीय गुरुची साधी आठवण केली? हा प्रश्न सुरेशदादा जैन यांच्यापुरता मर्यादित नाही. तो राजकारणातील कृतज्ञता, निष्ठा आणि स्मरणशक्ती या तीनही मूल्यांना आरसा दाखवतो.
राजकीय म्हण आहे—“सूर्य डोक्यावर असताना सावलीही मोठी दिसते; सूर्य मावळला की सावलीही लहान होते.” सत्ता आणि प्रभावाच्या काळात माणसांच्या गर्दीने घर भरून जाते. पण परिस्थिती बदलली की खरे संबंध कोणते आणि राजकीय गरजेतून निर्माण झालेले संबंध कोणते, हे स्पष्ट होते.
म्हणूनच आजच्या राजकीय बुद्धिबळाच्या पटलावर असलेल्या राजे-वजीरांनी सुरेशदादा जैन यांच्या राजकीय पर्वाकडे केवळ एका जुन्या नेत्याच्या आठवणी म्हणून पाहू नये. हा एक धडा आहे. माणसे कमावणे महत्त्वाचे की पदे कमावणे? निष्ठा निर्माण करणे महत्त्वाचे की गर्दी जमवणे? आणि सर्वांत महत्त्वाचे—ज्यांनी आपल्याला उभे केले, त्यांना आपण कधी आठवतो?
राजकारणातील पदे बदलतात, पक्ष बदलतात, समीकरणे बदलतात आणि चेहरेही बदलतात. पण इतिहास मात्र सगळ्याची नोंद ठेवतो. संत तुकाराम महाराजांचा विचार या ठिकाणी अधिक बोलका ठरतो—“जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले.”
शेवटी राजकारण म्हणजे केवळ निवडणूक जिंकण्याची कला नाही; ती माणसे जोडण्याची आणि त्यांना घडवण्याची प्रक्रिया आहे. सुरेशदादा जैन यांच्या राजकीय पर्वाचे मूल्यमापन भविष्यात इतिहासकार आपापल्या पद्धतीने करतील. त्यांच्या निर्णयांशी कोण सहमत असेल, कोण असहमत असेल, हेही काळ ठरवेल. पण एक प्रश्न आजही जिवंत आहे—ज्यांनी अनेकांना राजकारणात चालायला शिकवले, त्या राजकीय शिक्षकाची आठवण त्यांचे विद्यार्थी किती काळ ठेवतात?
आणि मग ओठांवर नकळत येते—“वक्त ने किया क्या हसीं सितम, हम रहे न हम, तुम रहे न तुम…”
काळ बदलला. राजकीय पट बदलला. मोहरे बदलले. पण त्या बंगल्याबाहेरची गर्दी, त्या काळातील प्रभाव आणि त्या प्रभावातून घडलेली माणसे—ही जळगावच्या राजकीय इतिहासातील एक विस्मरणीय कहाणी ठरली आहे.
Dhyeya News & सा. झुंजसंपादक..-संदीप दा. महाजन, पाचोरा जि. जळगाव
(M.A.B.Ed) & Journalism
M0 7588645907 /73 8510 8510 नम्र विनंती – ज्यांना वरील मजकूर विचार योग्य वाटले असतील त्यांनी आपल्या स्तरावरून वरील लेखातील कोणताही शब्द कट अथवा फेरफार न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून Send करणेस विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!