![]()
पाचोरा : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री. गो.से. हायस्कूलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २००व्या जयंती वर्षानिमित्त प्रख्यात शिवव्याख्याते प्रा. लीलाधर पाटील लिखित ‘महात्मा’ या पथनाट्याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. महात्मा फुले यांच्या शिक्षणक्रांती, स्त्रीशिक्षण, सामाजिक समता, जातिभेद निर्मूलन आणि वंचित घटकांच्या उत्थानाचा विचार पथनाट्यातून प्रभावीपणे मांडण्यात आला. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्यासाठी महात्मा फुले यांनी केलेले कार्य तसेच स्त्रीशिक्षणाच्या प्रसारासाठी सावित्रीबाई फुले यांच्या साथीने उभारलेली चळवळ यांचे प्रभावी चित्रण पथनाट्यात करण्यात आले. सामाजिक विषमता, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाची माहितीही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. पथनाट्याच्या प्रभावी सादरीकरणाला उपस्थित विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या समतावादी, पुरोगामी आणि मानवतावादी विचारांची ओळख झाली. यावेळी युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, शालेय समितीचे खलिल देशमुख, मुख्याध्यापक आर. एल. पाटील, उपमुख्याध्यापक पी. एम. पाटील, पर्यवेक्षक अंजली आर. गोहिल, आर. बी. बांठीया, एम. टी. कौंडिण्य, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. बोरसे, क्रीडा प्रमुख एस. पी. करंदे, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, सौ. ए. व्ही. पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. आर. पाटील यांनी केले, तर आभार आर. बी. बोरसे यांनी मानले.





























