Home Dhyeya News Special परधाड्यात गणरायाच्या उत्सवाची जय्यत तयारी; भजनी मंडळांच्या सहभागाने पालखी सोहळा रंगणार, बक्षिसांचा...

परधाड्यात गणरायाच्या उत्सवाची जय्यत तयारी; भजनी मंडळांच्या सहभागाने पालखी सोहळा रंगणार, बक्षिसांचा वर्षाव

0
216

Loading

परधाडे – ता. पाचोरा येथे सालाबादा प्रमाणे टाळ-मृदूंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि गणरायाच्या जयघोषाने परधाडे गाव भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. गणेशोत्सवानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून, परधाडे तसेच परिसरातील भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग हे यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. पारंपरिक भक्ती आणि लोककलेच्या संगमातून साकारला जाणारा हा सोहळा ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांसाठी पर्वणी ठरणार आहे. उत्सवाच्या कार्यक्रमांना सोमवार, दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 5.00 वाजता काकड आरतीने सुरुवात होणार आहे. पहाटेच्या मंगलमय वातावरणात गणरायाचे नामस्मरण आणि आरतीने उत्सवाचा प्रारंभ होणार असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यानंतर दुपारी 3.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशभक्त तसेच ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. दरम्यान, रात्रीच्या कार्यक्रमाकडे परिसरातील भाविकांचे विशेष लक्ष लागले आहे. रात्री 9.00 वाजता पालखी सोहळा सुरू होणार असून, पालखी पारावरून निघून वडाच्या चौकात पोहोचणार आहे. पालखीचे चौकात आगमन होताच वातावरणात भक्तीचा उत्साह अधिकच वाढणार असून, त्यानंतर भजन, गौळणी आणि भारुड यांचा कार्यक्रम रंगणार आहे. या सोहळ्यात परधाडे गावातील तसेच परिसरातील विविध भजनी मंडळांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टाळ, मृदूंग, विणा आदी पारंपरिक वाद्यांच्या साथीने सादर होणारे भजन आणि गौळणी, तसेच भारुडाच्या माध्यमातून सादर होणारी लोकपरंपरा उपस्थितांचे लक्ष वेधून घेणार आहे. विविध मंडळांच्या सहभागामुळे पालखी सोहळ्याला अधिक व्यापक आणि उत्सवी स्वरूप प्राप्त होणार आहे. भजनी मंडळांचा उत्साह वाढविण्यासाठी यंदा बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार आहे. विशेष सहभाग नोंदविणाऱ्या तसेच पारंपरिक वाद्यांसह कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या दिंडी व भजनी मंडळांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार असल्याने परिसरातील मंडळांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. अधिकाधिक मंडळांनी सहभाग नोंदवून गणेशोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांसोबतच गावातील सामाजिक सलोखा, सांस्कृतिक वारसा आणि लोकपरंपरा जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हावे, तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपापल्या परीने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. गणरायाचे दर्शन, काकड आरती, महाप्रसाद, पालखी सोहळा आणि त्यानंतर होणाऱ्या भजन, गौळणी व भारुडाचा आनंद घेण्यासाठी परधाडे तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि भाविकांच्या सहभागाने यंदाचा गणेशोत्सव अधिक उत्साहपूर्ण व संस्मरणीय करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!