Home Dhyeya News Special राष्ट्रीय महामार्ग 753 : पाचोरा बांबरुड शिवारातील तुगलकी कामकाजामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

राष्ट्रीय महामार्ग 753 : पाचोरा बांबरुड शिवारातील तुगलकी कामकाजामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

0
735

Loading

पाचोरा – राष्ट्रीय महामार्ग 753 च्या कामाबाबत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली तक्रारींची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. काम ज्या पद्धतीने सुरू आहे, ती पूर्णपणे तुकड्या-तुकड्यातील व तुगलकी धोरणाची असल्याची नाराजी स्थानिक नागरिक व शेतकरी आधीपासूनच व्यक्त करीत आहेत. आता या सर्वांवर आणखी एक पुष्टी तक्रार जोडली गेली असून बांबरुड (महादेवाचे) शिवारात घडलेली घटना याचे ताजे उदाहरण म्हणून समोर आली आहे. बांबरूड – अंतुर्ली लगत अचानकपणे चारीचे काम सुरू करण्यात आले. कोणत्याही नियोजनाशिवाय, कुठून प्रारंभ करायचा आणि कुठे अखेर करायची याचा एकही सलग मार्ग न ठेवता, मनात येईल तेव्हा आणि जेथे जागा मोकळी दिसेल तेथे काम सुरू करण्याची पद्धत राबविल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अशा असंघटित कामकाजामुळे जनतेत आधीच अस्वस्थता निर्माण झाली होती; आता शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर या असंतोषाला अधिक तीव्रता प्राप्त झाली आहे. या विभागाचे तज्ञ अधिकारी आनंद शेलार व धनंजय पाटील साहेब यांनी आजपर्यंत प्रसारमाध्यमांसमोर कधीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. कोणते काम कुठे चालू आहे, कोणत्या टप्प्यावर आहे, पुढील नियोजन काय आहे—याबाबतची अधिकृत माहिती कधीही पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिक आणि विशेषत: शेतकरी संभ्रमात पडले आहेत. महामार्गाचे काम नक्की कोणत्या दिशेने चालले आहे, कोणता भाग कधी घेतला जाणार आहे, किती क्षेत्र संपादित आहे, हे काहीच स्पष्ट दिसत नसल्याने तक्रारी वाढत चालल्या आहेत. या सर्व प्रकारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बांबरुड शिवारात मोजून 15 ते 20 मीटर अंतराची चारी अचानक खोदण्यात आली. ही चारी खोदताना संबंधित शेतकऱ्यांना कोणतेही नोटिस न देता, पूर्वसूचना न देता काम सुरू केल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला. या क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली होती. परंतु चारी तयार करण्यासाठी आलेल्या यंत्रांनी कुणालाही माहिती न देता सरळ शेतात प्रवेश केला आणि पिकांवर माती टाकण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचे उभे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे संबंधित शेतकऱ्यांच्या मालकीतील किती क्षेत्र अधिकृत केले आहे, किती भूखंड संपादित झाले आहेत याची अधिकृत कल्पना त्यांना देण्यात आलेली नाही. जे शेत त्यांच्या ताब्यात होते, जिथे त्यांनी स्वतःच्या मेहनतीने पेरणी केली होती, त्या शेताचे अचानक नुकसान होणे ही मोठी अन्यायकारक बाब असून यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. आता या प्रकरणी स्थानिक पातळीवर तीव्र चर्चा सुरू असून शेतकरी संघटनांसह ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक भरपाई मिळावी आणि त्यांचे शेत जैसे थे करून देण्यात यावे, तसेच पुढील कामकाज करताना अधिकृत व लिखित स्वरूपातील पूर्वसूचना देणे अनिवार्य करावे, अशी जोरदार मागणी होत आहे. महामार्गाचे काम कितीही महत्त्वाचे असले, तरी ते नियोजनशून्य, मनमानी व तुगलकी स्वरूपात झाल्यास शेवटी शेतकऱ्यांचेच मोठे नुकसान होते, याची ही घटना ठळक जाणीव करून देते. या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रीय महामार्ग 753 च्या कामकाजातील अनागोंदी, गैरव्यवस्थापन, आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. कृषिप्रधान भागातील शेतकऱ्यांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणाऱ्या अशा घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता तीव्र होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!