Home Dhyeya News Special राष्ट्रीय सेवा योजनेतून घडतो जबाबदार नागरिकांचा पाया- प्राचार्य डॉ अंजने

राष्ट्रीय सेवा योजनेतून घडतो जबाबदार नागरिकांचा पाया- प्राचार्य डॉ अंजने

0
10

Loading

ऐनपूर : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप विटवा या गावात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजभान, श्रमप्रतिष्ठा आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारे हे सात दिवसीय शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले. या शिबिरातून जबाबदार नागरिक घडतात, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी समारोपप्रसंगी केले. या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, ऐनपूर संस्थेचे माजी सेक्रेटरी गंभीर शेनू चौधरी होते. कार्यक्रमास ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भागवत भाऊ पाटील, उपाध्यक्ष रामदास नारायण महाजन, सचिव संजय पाटील, संचालक पी. आर. चौधरी, कैलास पाटील, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य पांडुरंग पाटील व दिलीप पाटील, सिनेट सदस्य प्रा. डॉ. पद्माकर पाटील, धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत विटवा येथील सरपंच मुकेश चौधरी, मुख्याध्यापक विजय चौधरी, ग्रामसेवक मनोहर चौधरी, उपसरपंच ईश्वर चौधरी, प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कोमल धामोडकर व काजल कोळी यांच्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना गीत सादर करण्यात आले. मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विनोद रामटेके यांनी शिबिराचा सात दिवसांचा सविस्तर अहवाल सादर केला. या अहवालात त्यांनी शिबिरकाळात राबविण्यात आलेल्या विविध श्रमसंस्कार उपक्रमांची माहिती देताना शोषखड्डा व स्मशानभूमीची स्वच्छता, महिला शौचालयांची साफसफाई, गुरांच्या पाणी पिण्याच्या हौदांची स्वच्छता, मंदिर परिसर, ग्रामीण रुग्णालय परिसर, प्राथमिक शाळेचा परिसर स्वच्छ करणे, गटारी साफसफाई आदी कामे स्वयंसेवकांनी अत्यंत जबाबदारीने पार पाडल्याचे सांगितले. शिबिराच्या वैचारिक प्रबोधन सत्रात विविध विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले. पाणी व्यवस्थापनावर विजय चौधरी, वित्तीय साक्षरतेवर प्रमोद पाटील, पत्रकारिता – काल, आज आणि उद्या या विषयावर अनिल आसेकर, युवा संवादावर दिलशाद शेख, बालविवाह प्रतिबंधक कायद्यावर प्रा. डॉ. नीता जाधव, सोशल मीडियावर डॉ. एस. एस. साळुंके, शाश्वत विकासात युवकांचे योगदान या विषयावर प्रा. डॉ. जयंत नेहेते, आपत्ती व्यवस्थापनावर प्रा. डॉ. चतुर गाढे, स्वच्छ भारत अभियानावर प्रा. डॉ. जी. आर. ढेंमरे, मतदार जनजागृतीवर प्रा. हेमंत बाविस्कर, शाश्वत विकासासाठी युवक या विषयावर अल्ताफ पटेल तर स्पर्धा परीक्षांबाबत पोलिस उपनिरीक्षक हरीदास बोचरे यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव, कायदेविषयक माहिती, करिअरविषयक दिशा आणि नागरिक म्हणून असलेली जबाबदारी यांचे महत्त्व समजले. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर प्रभावी पथनाट्ये सादर करून ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. तसेच ग्राम सर्वेक्षण करून गावातील समस्या, गरजा आणि विकासाच्या संधींचा अभ्यास करण्यात आला. या सात दिवसांच्या शिबिरात गावकऱ्यांनी तसेच ग्रामपंचायत विटवा यांनी दिलेले सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले, असेही प्रा. डॉ. रामटेके यांनी नमूद केले. समारोपप्रसंगी अनुष्का लवंगे, अर्पिता चौधरी, प्रतीक्षा पाटील, सुहानी पाटील, काजल कोळी, पवन कोळी, श्रेयश पाटील, वैष्णवी महाजन व जान्हवी पाटील या स्वयंसेवकांनी आपल्या मनोगतातून शिबिरातील अनुभव कथन करताना या शिबिरामुळे स्वतःच्या विचारसरणीत आणि सामाजिक जाणीवेत सकारात्मक बदल झाल्याची भावना व्यक्त केली. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. उमरीवाड यांनीही शिबिरातील शिस्त, एकोप्याची भावना आणि सेवाभाव याबाबत समाधान व्यक्त केले. विटवा गावचे प्रथम नागरिक सरपंच मुकेश चौधरी यांनी स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक करताना, त्यांच्या स्वच्छता मोहिमेमुळे गावाचा कायापालट झाल्याची भावना व्यक्त केली. उपाध्यक्ष रामदास महाजन यांनी शिबिर यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद करताना, हा काळ आयुष्याला सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा असून श्रमाचे महत्त्व, समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची शिकवण यातून मिळते, असे प्रतिपादन केले. या समारोप समारंभाचे सूत्रसंचालन कुमारी दीक्षा पाटील हिने केले तर मान्यवरांचे आभार वैष्णवी पाटील या स्वयंसेविकेने मानले. शिबिर यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. विनोद रामटेके, प्रा. साईनाथ उमरीवाड, प्रा. डॉ. रेखा पाटील, प्रा. डॉ. जे. पी. नेहेते, प्रा. कोमल सुतार, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, अनिकेत पाटील, श्रेयस पाटील, सेवा निवृत्त लिपिक श्रीराम चौधरी व हर्षल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. अध्यक्षांच्या परवानगीने राष्ट्रगीताने या समारोप समारंभाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!