![]()
पाचोरा : ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्येही गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि आधुनिक अध्यापन पद्धतीच्या बळावर राज्यस्तरावर वेगळी ओळख निर्माण होऊ शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पना व प्रेरणेतून शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या “नाविन्यपूर्ण व उपक्रमशील प्रेरणादायी शाळांची मालिका” या राज्यस्तरीय उपक्रमात पाचोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा होळ आणि जिल्हा परिषद शाळा नांद्रा या दोन्ही शाळांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून अंतिम टप्प्यात निवड झालेल्या केवळ ५२ शाळांमध्ये
पाचोरा तालुक्यातील या दोन जिल्हा परिषद शाळांनी मानाचे स्थान मिळविल्याने तालुक्याच्या शैक्षणिक कार्याचा राज्यभर गौरव झाला आहे. १ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या मालिकेतील क्रमांक ५२ मध्ये जिल्हा परिषद शाळा होळचा समावेश करण्यात आला असून, यापूर्वी जिल्हा परिषद शाळा नांद्राचीही या मालिकेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे पाचोरा तालुक्याने राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख अधोरेखित केली आहे. राज्यातील मराठी शाळांमध्ये राबविण्यात येणारे अभिनव शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पर्यावरणपूरक संकल्पना, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या प्रभावी कार्याची माहिती राज्यभर पोहोचावी, या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने ही प्रेरणादायी मालिका सुरू केली आहे. प्रत्येक निवडलेल्या शाळेचा एका मिनिटाच्या रीलद्वारे परिचय करून देण्यात येत असून मराठी शाळांमधील सकारात्मक बदल, शिक्षकांचे समर्पण, विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा प्रभावीपणे राज्यासमोर मांडली जात आहे. मराठी शाळांविषयी पालक व समाजामध्ये विश्वास अधिक दृढ व्हावा, विद्यार्थ्यांचा शाळांकडे ओढा वाढावा, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रेरणा मिळावी तसेच राज्यातील इतर शाळांनीही अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अवलंब करावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. या राज्यस्तरीय उपक्रमासाठी विविध जिल्ह्यांतील अनेक उपक्रमशील शाळांचे विविध निकषांच्या आधारे सखोल परीक्षण करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सहभाग, नाविन्यपूर्ण उपक्रम, समाजसहभाग, शाळेची प्रगती आणि परिणामकारक कार्यपद्धती यांचा सर्वंकष आढावा घेऊन अंतिम यादी निश्चित करण्यात आली. त्या कठोर निवड प्रक्रियेनंतर पाचोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा होळ आणि जिल्हा परिषद शाळा नांद्रा या दोन्ही शाळांची अंतिम यादीत निवड होणे ही संपूर्ण तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांची राज्यस्तरीय पावती मानली जात आहे. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण रील निर्मितीसाठी कोणत्याही व्यावसायिक तांत्रिक संस्थेची मदत घेण्यात आलेली नाही. राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी शून्य खर्चातून केवळ साध्या मोबाईलच्या सहाय्याने हे दर्जेदार व्हिडिओ तयार केले आहेत. त्यामुळे मराठी शाळांचे वास्तव, ग्रामीण शिक्षणाची ताकद, शिक्षकांचे समर्पण, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शाळांमध्ये घडत असलेले सकारात्मक परिवर्तन यांचे अस्सल दर्शन या मालिकेतून घडत आहे. या उपक्रमामुळे राज्यातील शिक्षकांची सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्यालाही नवे व्यासपीठ मिळाले आहे. विशेष म्हणजे या शैक्षणिक वर्षापासून सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमात पाचोरा तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळांची निवड होणे ही गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कामगिरी मानली जात आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा होळ आणि जिल्हा परिषद शाळा नांद्रा या दोन्ही शाळांनी राज्यस्तरावर मानाचे स्थान मिळविल्याबद्दल आनंद व्यक्त केला. दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत या यशाचे संपूर्ण श्रेय स्थानिक ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या सर्व शिक्षणप्रेमींना दिले. सामूहिक प्रयत्न, शिक्षणाबद्दलची निष्ठा, नवोपक्रमांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी आणि समाजाचा सक्रिय सहभाग यामुळेच पाचोरा तालुक्याने राज्याच्या शैक्षणिक नकाशावर स्वतंत्र आणि ठळक ओळख निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले. शालेय शिक्षण विभागाने शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींना या प्रेरणादायी रील्सचा सामाजिक माध्यमांद्वारे व्यापक प्रसार करण्याचे आवाहन केले असून मराठी शाळांविषयी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती सचिन चव्हाण, विशेष कार्य अधिकारी, शालेय शिक्षण मंत्री कार्यालय यांनी प्रसिद्धीस दिली आहे. दरम्यान, ‘झुंज’ साप्ताहिक व ‘ध्येय न्यूज’चे संपादक संदीप महाजन यांनी राज्यस्तरावर निवड झालेल्या जिल्हा परिषद शाळा होळ व जिल्हा परिषद शाळा नांद्रा या दोन्ही शाळांचे, संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ तसेच गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ग्रामीण भागातील मराठी शाळांनी गुणवत्तेच्या बळावर राज्यात मानाचे स्थान मिळविल्याचा हा क्षण संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी असून, भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्यातून पाचोऱ्याचे नाव राज्यभर अधिक उज्ज्वल व्हावे आणि तालुक्यातील इतर शाळांनाही या यशातून प्रेरणा मिळावी, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.





























