Home Dhyeya News Special जळगाव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी अँड. अविनाश भालेराव; निष्ठा, संघटनशक्ती आणि अनुभवाला पक्षाची मोठी...

जळगाव काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी अँड. अविनाश भालेराव; निष्ठा, संघटनशक्ती आणि अनुभवाला पक्षाची मोठी दाद

0
132

Loading

पाचोरा – महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संघटन बळकटीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून राबविण्यात आलेल्या व्यापक संघटन सृजन मोहिमेतून राज्यभर नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून जळगाव जिल्हा ग्रामीण पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी अँड. अविनाश मुकुंदराव भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष संघटनेत गेली अनेक वर्षे सातत्याने सक्रिय राहून विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणाऱ्या आणि कठीण काळातही काँग्रेसशी निष्ठा कायम ठेवणाऱ्या नेतृत्वाला पक्षाने दिलेली ही महत्त्वपूर्ण जबाबदारी मानली जात आहे. काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन सचिव खासदार के. सी. वेणूगोपाल यांनी राज्यातील विविध ६० जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या एका संयुक्त पत्राद्वारे जाहीर केल्या. या नियुक्त्यांपूर्वी जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर जाऊन पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते, युवक, महिला आणि सर्वसमावेशक घटकांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. पक्ष संघटनेत कार्यरत असलेल्या जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेऊन जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबविण्यात आल्याने या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मूळ पाचोरा येथील असलेल्या अँड. अविनाश भालेराव यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाची सुरुवात केली. एनएसयुआयच्या शहर उपाध्यक्ष पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला. गेल्या तब्बल २७ वर्षांपासून त्यांनी पक्ष संघटनेत सातत्याने काम करत कार्यकर्त्यांशी थेट संपर्क कायम ठेवला आहे. पक्षातील विविध स्तरांवरील अनुभव, संघटन कौशल्य आणि संयमी नेतृत्वशैली यामुळे त्यांची ओळख जिल्ह्यात निर्माण झाली आहे. राजकीय क्षेत्रासोबतच सहकार, शिक्षण आणि प्रशासकीय क्षेत्रातही अँड. अविनाश भालेराव यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. दि. पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक जि. जळगावचे ते विद्यमान संचालक असून गेल्या पंचवीस वर्षांपासून या संस्थेशी त्यांचा जवळचा संबंध आहे. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. पाचोरा नगरपालिकेत माजी नगरसेवक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली असून स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. विविध शासकीय समित्या आणि पदांवर त्यांच्या नियुक्त्या झाल्या असून प्रशासन आणि जनतेमध्ये समन्वय राखण्याची त्यांची कार्यपद्धती अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी केवळ पदांपुरते मर्यादित न राहता कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यावर भर दिला. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश केला. विशेषतः भाजपमध्ये जाऊन अनेकांनी महत्त्वाची पदे मिळविली. अशा परिस्थितीत अँड. अविनाश भालेराव यांच्यासमोरही अनेक संधी उपलब्ध होत्या. मात्र, त्यांनी काँग्रेस पक्षाशी असलेली वैचारिक बांधिलकी आणि निष्ठा कायम ठेवली. कठीण काळात पक्षासोबत राहणाऱ्या नेतृत्वाला प्राधान्य देण्याचा संदेश या नियुक्तीतून पक्षश्रेष्ठींनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जळगाव जिल्हा ग्रामीण पश्चिम विभागात पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, एरंडोल आणि धरणगाव या सात तालुक्यांचा समावेश होतो. या भागात सध्या काँग्रेस पक्षाला अनेक राजकीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे. स्थानिक पातळीवर संघटन उभारणी, कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणे, युवकांना पक्षाशी जोडणे आणि ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढविणे हे मोठे आव्हान अँड. अविनाश भालेराव यांच्यासमोर असणार आहे. त्यांच्या निवडीमुळे काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागात पक्ष पुन्हा सक्रिय होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः संघटन कौशल्य, संयमित भूमिका आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याची पद्धत यामुळे आगामी काळात ते पक्षासाठी प्रभावी रणनीती उभी करतील, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला नवसंजीवनी देण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नेतृत्वाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!