Home Dhyeya News Special आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांच्या धडाक्याने अन्नभेसळ माफियांचे धाबे दणाणले; एका अधिकाऱ्याने संपूर्ण...

आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांच्या धडाक्याने अन्नभेसळ माफियांचे धाबे दणाणले; एका अधिकाऱ्याने संपूर्ण यंत्रणा कशी बदलू शकते याची महाराष्ट्राला पुन्हा प्रचिती

0
232

Loading

“एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है” हा अभिनेता नाना पाटेकर यांचा गाजलेला चित्रपटातील संवाद आजही अनेकांच्या स्मरणात आहे. या संवादाचा आशय असा की एखादी छोटी वाटणारी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती संपूर्ण परिस्थिती बदलण्याची ताकद ठेवते. प्रशासनाच्या क्षेत्रातही हेच तत्त्व लागू होते. एखाद्या विभागाला जर स्वच्छ प्रतिमा, कठोर निर्णयक्षमता आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेतृत्व लाभले, तर त्या विभागाचे कामकाज, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास आणि जनतेचा विश्वास या सर्व गोष्टींमध्ये आश्चर्यकारक बदल घडू शकतो. सध्या महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन विभागाबाबत नेमकी अशीच चर्चा सुरू आहे आणि त्यामागे केंद्रस्थानी आहेत आदरणीय तुकाराम मुंडे साहेब. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून आदरणीय  तुकाराम  मुंडे साहेब यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील या विभागाच्या कार्यपद्धतीत अचानक आलेली गती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक वर्षांपासून दूध, तूप, पनीर, खवा, मिठाई तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ, निकृष्ट दर्जाचे उत्पादन आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रकारांबाबत तक्रारी होत होत्या. अनेक वेळा जनतेकडून आवाज उठवला गेला, समाजमाध्यमांवर चर्चा झाली, वृत्तपत्रांतून प्रश्न उपस्थित झाले; मात्र प्रत्यक्षात भेसळ करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती निर्माण झाल्याचे चित्र फारसे दिसत नव्हते. यामागे कारण काय, असा प्रश्न सामान्य नागरिकांना नेहमी पडत असे. त्याचे उत्तर प्रशासनाच्या वास्तवात दडलेले आहे. एखाद्या विभागात खालच्या स्तरापासून ते वरिष्ठ स्तरापर्यंत विविध प्रकारचे दबाव, स्वार्थ आणि भ्रष्ट प्रवृत्तींचे जाळे निर्माण झाले असेल, तर प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचारी अनेकदा हतबल होतात. नियमांनुसार काम करण्याची इच्छा असूनही त्यांना कारवाई करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांचे मनोबल वाढते आणि नियम पाळणारे मागे पडतात. मात्र जेव्हा विभागाच्या सर्वोच्च पदावर आदरणीय तुकाराम मुंडे साहेब यांच्यासारखा अधिकारी येतो, तेव्हा संपूर्ण वातावरण बदलू लागते. कारण अशा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रामाणिक कर्मचारी आणि अधिकारी स्वतःला सुरक्षित समजू लागतात. “आपल्या मागे सक्षम नेतृत्व उभे आहे” ही भावना त्यांच्यात निर्माण होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या दबावाची पर्वा न करता नियमांची अंमलबजावणी करण्याचे धाडस वाढते. अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अशा नेतृत्वाखाली काम करण्यात अभिमान वाटतो. कारवाई केल्यावर कोणी पाठीशी उभे राहील का, हा प्रश्न राहत नाही. त्यामुळे यंत्रणा अधिक सक्रिय, परिणामकारक आणि जनहिताभिमुख बनते. जळगाव जिल्ह्यात यापूर्वी अशाच प्रकारचा अनुभव नागरिकांनी घेतला होता. रस्तोगी साहेब पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना जिल्ह्यात कायद्याचा धाक निर्माण झाला होता. त्यांच्या कार्यकाळात अनेक बेकायदेशीर प्रकारांवर प्रभावी नियंत्रण आले होते. कायद्याचे पालन करणाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती, तर नियम मोडणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनातील नेतृत्वाचे महत्त्व काय असते याचे ते उत्तम उदाहरण मानले जाते. पाचोरा शहरानेही याच प्रकारचा अनुभव जवळून घेतला आहे. DYSP प्रशिक्षणार्थी म्हणून सचिन कदम साहेब काही महिन्यांसाठी पाचोरा येथे आले होते. त्यांचा कार्यकाळ अल्प असला तरी त्यांनी निर्माण केलेला प्रभाव आजही नागरिकांच्या स्मरणात कायम आहे. त्या काळात अवैध प्रवासी वाहतूक, वाहतूक नियमांचे उल्लंघन, विविध बेकायदेशीर धंदे आणि सार्वजनिक शिस्त भंग करणाऱ्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे शहरापुरतेच नव्हे तर ग्रामीण भागातही गुटख्याच्या विक्रीवर मोठ्या प्रमाणात अंकुश बसला होता. त्या काळात एक वाक्य लोकांमध्ये विनोदाने पण तितक्याच गांभीर्याने बोलले जात होते – “गुटका छुपा दे बेटा, नहीं तो सचिन कदम साहेब आएंगे.” हे वाक्य केवळ हास्यनिर्मिती करणारे नव्हते, तर एका अधिकाऱ्याने निर्माण केलेल्या कायद्याच्या धाकाचे प्रतीक बनले होते. सचिन कदम साहेब प्रशिक्षणार्थी अधिकारी असल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा बदलीची भीती नव्हती. त्यामुळे त्यांनी निर्भीडपणे निर्णय घेतले आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की अधिकाऱ्यांना जर निर्भयपणे काम करू दिले, त्यांच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप टाळला आणि त्यांना वरिष्ठांचे संरक्षण मिळाले, तर आजही महाराष्ट्रात “सिंघम” शैलीने काम करणारे अधिकारी मोठ्या संख्येने आहेत. आज आदरणीय तुकाराम मुंडे साहेब यांच्या नियुक्तीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागात दिसणारी हालचाल अनेकांना याच अनुभवांची आठवण करून देत आहे. राज्यभर सुरू झालेल्या तपासण्या, कारवाया आणि विभागाची वाढलेली सक्रियता यामुळे भेसळ करणाऱ्या घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या काही व्यवहारांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. अन्नभेसळ हा केवळ आर्थिक गुन्हा नसून तो थेट जनतेच्या आरोग्यावर हल्ला करणारा प्रकार आहे. त्यामुळे या क्षेत्रात कठोर कारवाई होणे ही काळाची गरज असल्याचे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. सध्या बाजारपेठेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उपलब्धतेबाबतही विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. पूर्वी कोणताही समारंभ असो, मटर पनीर किंवा पनीरयुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध होत असे. मागणी असेल तितका माल मिळत असे. मात्र अलीकडच्या काळात काही व्यापारी आणि ग्राहकांकडून दुग्धजन्य पदार्थांच्या उपलब्धतेत घट झाल्याची चर्चा केली जात आहे. यामागे नेमके कारण काय आहे याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी विभागाच्या वाढलेल्या कारवायांमुळे अनेक उत्पादक अधिक सावध झाले असल्याची चर्चा बाजारपेठेत ऐकायला मिळते. या चर्चांदरम्यान काही नागरिक विनोदानेतुकाराम मुंडे साहेब यांचाही उल्लेख करताना दिसतात. प्रशासनातील कठोर निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंडे साहेब यांच्या नावाशी जोडून विविध उपरोधिक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. “गाई-म्हशीच राज्याबाहेर गेल्या असाव्यात म्हणून दुधाची टंचाई निर्माण झाली असेल,” अशा प्रकारच्या विनोदी टिप्पणी काही ठिकाणी ऐकायला मिळतात. अर्थात या प्रतिक्रिया वास्तवापेक्षा लोकांच्या भावना आणि चर्चेचा भाग अधिक आहेत. दरम्यान, आदरणीय तुकाराम मुंडे साहेब या विभागात किती काळ राहतील, हा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. कारण प्रशासनात कठोर भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत विविध चर्चा नेहमीच रंगत असतात. प्रभावशाली हितसंबंधांना धक्का बसला की अशा अधिकाऱ्यांना इतर विभागात पाठवले जाते, अशी सर्वसामान्यांमध्ये धारणा आहे. त्यामुळे आज सुरू असलेली ही धडक मोहीम किती काळ सुरू राहील, याबाबतही उत्सुकता आहे. मात्र या सर्व चर्चांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनतेच्या अपेक्षा. महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना भेसळमुक्त अन्नपदार्थ हवे आहेत. दूध, तूप, पनीर, खवा, मिठाई किंवा इतर कोणतेही खाद्यपदार्थ विकत घेताना त्यांच्या गुणवत्तेबाबत शंका वाटू नये, ही प्रत्येक ग्राहकाची अपेक्षा आहे. त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी कठोर प्रशासन आणि सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असते. आज आदरणीय तुकाराम मुंडे साहेब यांच्या नियुक्तीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाबाबत निर्माण झालेली सकारात्मक चर्चा ही केवळ एका अधिकाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वापुरती मर्यादित नाही. ती सुशासन, पारदर्शकता, जबाबदारी आणि जनहित यांच्याशी जोडलेली आहे. एका सक्षम अधिकाऱ्याच्या नेतृत्वामुळे संपूर्ण यंत्रणा नव्या उर्जेने काम करू शकते, कर्मचारी आणि अधिकारी अधिक आत्मविश्वासाने पुढे येऊ शकतात आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण होऊ शकते, याची प्रचिती महाराष्ट्र पुन्हा एकदा अनुभवत आहे. याच भावनेतून अनेक नागरिक परमेश्वराकडे एक प्रार्थना व्यक्त करताना दिसतात. ज्या प्रकारे आदरणीय तुकाराम मुंडे साहेब विविध विभागांमध्ये कार्यक्षम, निर्भीड आणि जनहिताभिमुख प्रशासनाची ओळख निर्माण करत आहेत, त्याच प्रकारचे नेतृत्व देशातील इतर महत्त्वाच्या संस्थांनाही लाभावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. काही नागरिक तर भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदीही आदरणीय तुकाराम मुंडे साहेब यांच्यासारख्या कठोर, पारदर्शक आणि निःपक्षपाती अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी, अशी इच्छा व्यक्त करतात. भविष्य काय ठरवेल हे काळच सांगेल; मात्र एवढे निश्चित की आदरणीय तुकाराम मुंडे साहेब यांच्या नियुक्तीनंतर अन्नभेसळीविरोधातील कारवायांना मिळालेली गती, विभागातील वाढलेली सक्रियता आणि जनतेमध्ये निर्माण झालेला विश्वास यामुळे हे नाव सध्या महाराष्ट्रातील प्रशासनिक चर्चेच्या केंद्रस्थानी पोहोचले आहे. एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाने संपूर्ण व्यवस्थेत सकारात्मक परिवर्तन घडू शकते, हा विश्वास पुन्हा एकदा दृढ होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!