Home Dhyeya News Special जिल्हा बँक निवडणुकीत किशोरआप्पा पाटील यांच्या नावाला एकतर्फी पसंती; पुढील नेतृत्वाबाबत उत्सुकता

जिल्हा बँक निवडणुकीत किशोरआप्पा पाटील यांच्या नावाला एकतर्फी पसंती; पुढील नेतृत्वाबाबत उत्सुकता

0
111

Loading

पाचोरा : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील हालचालींना वेग आला असून, निवडणुकीसाठी होणारे मतदानाचे ठराव एकतर्फीपणे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या बाजूने होत असल्याचे चित्र आहे. पाचोरा तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील राजकारणात आमदार किशोरआप्पा पाटील यांचे दीर्घकाळापासून प्रभावी नेतृत्व राहिले आहे. तब्बल चार टर्मपासून पाचोरा तालुक्याच्या नेतृत्वाची धुरा त्यांनी जिल्हा बँकेत सांभाळली असून, या प्रदीर्घ कालावधीत सहकार क्षेत्रातील विविध संस्थांशी त्यांचा थेट संपर्क आणि समन्वय राहिला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही तालुक्यातील मतदानाचे ठराव त्यांच्या बाजूने होत असल्याने त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास पुन्हा अधोरेखित होत असल्याचे मानले जात आहे. मात्र, यंदाची निवडणूक काहीशी वेगळी ठरण्याची शक्यता आहे. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यावर आगामी काळात पक्षाची मोठी राजकीय जबाबदारी येण्याची शक्यता आणि संभाव्य मंत्रीपदाची चर्चा लक्षात घेता, जिल्हा बँकेतील प्रतिनिधित्वाची जबाबदारी पुढील पिढीकडे सोपविण्याचा पर्यायही चर्चेत आला आहे. यामध्ये पाचोरा नगरपालिका शिवसेना गट नेते सुमित किशोरआप्पा पाटील यांचे नाव विशेषत्वाने पुढे येत आहे. युवकांमध्ये लोकप्रिय असलेले सुमित किशोरआप्पा पाटील हे जनसेवेच्या कामात सक्रिय असून, वडिलांच्या राजकीय वाटचालीचा वारसा पुढे नेताना अनेक बाबतीत एक पाऊल नव्हे तर दहा पावले पुढे जाण्याची त्यांची कार्यपद्धती समर्थकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. पाचोरा तालुक्यातील सहकार क्षेत्रात आमदार किशोरआप्पा पाटील यांच्याबद्दल असलेला विश्वास मतदानाच्या ठरावांतून स्पष्ट होत असतानाच, भविष्यातील नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे सोपविली जाणार, हा प्रश्न आता अधिक महत्त्वाचा ठरत आहे. ठरावांचा कौल किशोरआप्पा पाटील यांच्या बाजूने असला, तरी उमेदवारीचा अंतिम निर्णय कोणता राजकीय संदेश देणार, याकडे सहकार क्षेत्रासह संपूर्ण पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा बँकेतील पुढील प्रतिनिधित्वाबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमदार किशोरआप्पा पाटील यांच्याच हाती असल्याने त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. पुन्हा स्वतः जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरून पाचोरा तालुक्याचे नेतृत्व कायम ठेवायचे की, बदलत्या राजकीय जबाबदाऱ्यांचा विचार करून सुमित किशोरआप्पा पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपवायची, याचा निर्णय तेच घेणार आहेत. त्यामुळे सध्याच्या घडामोडींमध्ये ठरावांचा स्पष्ट कौल एका बाजूला असला, तरी अंतिम उमेदवार कोण असेल, हे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या निर्णयानंतरच निश्चित होणार आहे. परिणामी जिल्हा बँकेची ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रातील प्रतिनिधित्वाची निवडणूक न राहता, पाचोरा तालुक्यातील नेतृत्वाच्या पुढील पर्वाची दिशा निश्चित करणारी राजकीय घडामोड ठरण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!