Home Dhyeya News Special ९ ऑगस्ट, १५ ऑगस्ट झाले; हुतात्मा स्मारक परिसरातील घाणीचे साम्राज्य मात्र ‘जैसे...

९ ऑगस्ट, १५ ऑगस्ट झाले; हुतात्मा स्मारक परिसरातील घाणीचे साम्राज्य मात्र ‘जैसे थे’! पत्रकार संदीप महाजन यांचा नगरपालिका प्रशासनाला थेट सवाल – सफाई कर्मचारी नसतील तर स्वतः श्रमदान करून सफाई करण्यास तयार

0
65

Loading

पाचोरा : ९ ऑगस्ट क्रांती दिन आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरे झाले; मात्र ज्या स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाच्या स्मृती जपण्यासाठी हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे, त्याच स्मारकाच्या भिंतीलगत आज पुन्हा खडी, मुरूम, वाळू, माती, कचरा आणि अनावश्यक साहित्याचे ढिगारे दिसत असल्याने स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजीव गांधी टाऊन हॉलसमोरील महादेव मंदिरालगत असलेल्या हुतात्मा स्मारक परिसराची आजची ही अवस्था पाहता राष्ट्रीय दिवसांच्या निमित्ताने केलेली स्वच्छता आणि सजावट केवळ औपचारिक ठरली का, असा थेट सवाल पत्रकार तथा स्वातंत्र्य सैनिक पुत्र संदीप महाजन यांनी नगरपालिका प्रशासनाला केला आहे. हुतात्मा स्मारकाच्या भिंतीलगत असलेली खडी, मुरूम, वाळू आणि मातीचा साठा हटविण्याची आवश्यकता असताना त्याच परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने सार्वजनिक जागेचे स्वरूपच बिघडले आहे. प्लास्टिक पिशव्या, कागद, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि विविध प्रकारचा कचरा रस्त्याच्या कडेला पडलेला दिसत असून, काही ठिकाणी सांडपाण्यामुळे दुर्गंधीयुक्त परिस्थिती निर्माण झाल्याचेही चित्र आहे. त्यामुळे हा परिसर केवळ अस्वच्छ दिसत नाही, तर ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठीही गैरसोयीचा ठरत आहे. संदीप महाजन यांनी स्पष्ट केले की, या प्रश्नाचा संबंध कोणत्याही व्यक्तीची रोजीरोटी बंद करण्याशी नाही. ज्यांचा व्यवसाय आहे, त्यांनी आपला व्यवसाय करावा; मात्र सार्वजनिक जागेत खडी, मुरूम, वाळू, कचरा किंवा अनावश्यक साहित्य साठवून परिसराची अवस्था बिघडता कामा नये. प्रशासनाने व्यक्ती किंवा व्यवसायाला लक्ष्य करण्याऐवजी प्रत्यक्ष समस्या असलेल्या ठिकाणाची स्वच्छता करून सार्वजनिक जागा व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, या परिसरात भाजीपाला गाड्या व विक्रेत्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून नगरपालिका प्रशासनाचे विशेष पथक नियुक्त केले जाते. मग त्याच परिसरात हुतात्मा स्मारकाच्या भिंतीलगत खडी-मुरूम-वाळू आणि कचरा साचत असताना हे पथक केवळ अतिक्रमण पाहण्यासाठी आहे का? सार्वजनिक जागेतील अस्वच्छता आणि अनावश्यक साहित्य हटविण्याची जबाबदारीही प्रशासनाच्या यंत्रणेची नाही का, असा सवाल संदीप महाजन यांनी उपस्थित केला आहे. या परिसराची कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी केवळ एकदा कचरा उचलून भागणार नाही. हुतात्मा स्मारकाच्या भिंतीलगतचा संपूर्ण पट्टा स्वच्छ करून तेथे अनावश्यक साहित्य ठेवण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या जागेचा नियोजनबद्ध वापर करण्यासाठी दुचाकी वाहन पार्किंग स्थळ म्हणून फलक लावल्यास सार्वजनिक जागेचा योग्य उपयोग होऊ शकतो. पार्किंगची निश्चित व्यवस्था झाल्याने त्या ठिकाणी कचरा टाकणे किंवा अनधिकृतपणे साहित्य साठवणे यालाही आळा बसेल. नगरपालिका प्रशासनाकडे मनुष्यबळाची कमतरता असेल तर स्वातंत्र्यसैनिक पुत्र संदीप महाजन यांनी गांधीगिरीची भूमिका घेत, ट्रॅक्टर व आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिल्यास स्वतः श्रमदानातून खडी, मुरूम, वाळू, माती आणि कचरा हटविण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. मात्र ही वेळ नागरिकांनी श्रमदान करण्याची नसून नगरपालिका प्रशासनाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवण्याची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. हुतात्मा स्मारक हे केवळ दगड-विटांचे बांधकाम नसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाची आठवण आहे. त्यामुळे ९ ऑगस्ट आणि १५ ऑगस्टला अभिवादन करून काही तासांतच त्याच परिसरात पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होत असेल, तर राष्ट्रीय भावना आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये मोठी दरी असल्याचे दिसून येते. म्हणून नगरपालिका प्रशासनाने कोणाच्याही व्यवसायाला धक्का न लावता, हुतात्मा स्मारकाच्या भिंतीलगतची खडी, मुरूम, वाळू, माती, कचरा आणि अनावश्यक साहित्य तातडीने हटवून परिसर कायमस्वरूपी स्वच्छ व व्यवस्थित ठेवावा, अशी ठाम मागणी पत्रकार तथा स्वातंत्र्य सैनिक पुत्र संदीप महाजन यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!