![]()
पाचोरा : आगामी काळातील संघटनात्मक वाटचालीला अधिक बळ देण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा काँग्रेस अनु. जाती विभाग (पश्चिम) चे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड. अंकुश कटारे यांच्या नेतृत्वाखाली दि. 22 ते 24 ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आलेला जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांचा संघटनात्मक दौरा आज पाचोरा येथे झालेल्या बैठकीने यशस्वीरीत्या पूर्ण झाला. प्रदेश अध्यक्ष अनिरुद्ध वनकर व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांच्या सूचनेनुसार झालेल्या या दौऱ्यात ॲड. अंकुश कटारे यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राहुल मोरे तसेच माजी प्रदेश सचिव अनिरुद्ध सावळे ,आनंद बागुल, राजु भोसले यांनी विविध मतदारसंघांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. तीन दिवसांच्या दौऱ्यात चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, अमळनेर, धरणगाव, पारोळा, पाचोरा तसेच जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदारसंघांमध्ये बैठका घेऊन स्थानिक संघटनेची सद्यस्थिती, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, संघटनात्मक अडचणी आणि आगामी काळातील नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अनु. जाती विभागाचे संघटन अधिक व्यापक व सक्षम करण्यासोबतच तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करून काँग्रेस पक्षाची भूमिका समाजातील विविध घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यावर या दौऱ्यात विशेष भर देण्यात आला. तसेच जिल्हा कार्यकारिणी, तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्या निवडीसंदर्भात स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. संघटनात्मक जबाबदाऱ्या सक्षम व सक्रिय कार्यकर्त्यांकडे सोपवून पक्षाची संघटनात्मक घडी अधिक मजबूत करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेताना आगामी काळात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच कार्यकर्त्यांच्या सूचना यावर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आज पाचोरा येथे झालेल्या बैठकीने या तीन दिवसीय दौऱ्याचा समारोप झाला. दौऱ्याला विविध ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आगामी काळात जळगाव जिल्ह्यात काँग्रेस अनु. जाती विभागाचे संघटन अधिक गतिमान करण्यास या दौऱ्याची मोठी मदत होणार असल्याचे ॲड. अंकुश कटारे यांनी सांगितले. तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा समजून घेणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि आगामी काळात संघटनेला अधिक प्रभावी स्वरूप देणे हा या दौऱ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दौऱ्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनु. जाती विभागाच्या संघटनात्मक पुनर्बांधणीला चालना मिळाली असून, आगामी काळात पक्षाच्या विचारधारेनुसार विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जिल्हा काँग्रेस सरचिटणीस बाबा देशमुख व प्रदीप सोनवणे यांनी प्रसिद्ध केले आहे.





























