Home Dhyeya News Special पालकांच्या सक्रिय सहभागातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीचा संकल्प; श्री. गो.से. हायस्कूलमध्ये शिक्षक-पालक मेळावा उत्साहात

पालकांच्या सक्रिय सहभागातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीचा संकल्प; श्री. गो.से. हायस्कूलमध्ये शिक्षक-पालक मेळावा उत्साहात

0
1

Loading

पाचोरा : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात शाळा आणि पालक यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असतो. याच उद्देशाने पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल, पाचोरा येथे आयोजित शिक्षक-पालक मेळाव्याला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा, शाळेच्या उपक्रमांची माहिती आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी घ्यावयाची भूमिका यावर यावेळी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. दि. 24 ऑगस्ट रोजी कलादालन येथे सकाळी 10 वाजता मुख्याध्यापक एन. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. शिक्षक रुपेश पाटील यांनी ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर पर्यवेक्षक महेश कौंडिण्य यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक तसेच उपक्रमशील वाटचालीचा आढावा मांडला. मागील वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व गुणवत्ता वृद्धीच्या उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांचा सातत्यपूर्ण सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक एन. आर. पाटील यांनी विद्यालयातील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा आणि गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात विद्यालयाने तालुक्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविल्याचा उल्लेख करत त्यांनी शाळेच्या यशामागे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे योगदान असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम करणाऱ्या मोबाईलच्या अतिवापराबाबत त्यांनी पालकांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पर्यवेक्षिका अंजली गोहिल, पर्यवेक्षक महेश कौंडिण्य, पालक प्रतिनिधी बापू दगडू पाटील, नाझिया शेख आणि मुस्कान नाथानी उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने विशाल शिनकर, किरण ब्राह्मणे, राणी मराठे, छाया सोनवणे आणि शाहीनबी पटेल या पालकांचा प्रतिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. पालकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला आत्मीयतेचे वातावरण लाभले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत शिक्षकांसोबत पालकांनीही सक्रिय भूमिका बजावावी, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करावे, असा सकारात्मक संदेश या मेळाव्यातून देण्यात आला. शिक्षक व पालकांमधील संवाद अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम उपयुक्त ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख रवींद्र बोरसे यांनी केले, तर प्रमोद पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. मेळाव्यास बहुसंख्य पालकांची उपस्थिती लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!