Home Dhyeya News Special अंकुर’मधून उमलली महाविद्यालयाच्या वर्षभराच्या वाटचालीची सर्जनशील कहाणीशैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचा...

अंकुर’मधून उमलली महाविद्यालयाच्या वर्षभराच्या वाटचालीची सर्जनशील कहाणीशैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचा समृद्ध दस्तऐवज; विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला मिळाले हक्काचे व्यासपीठ

0
87

Loading

पाचोरा : एखाद्या शैक्षणिक संस्थेचा वर्षभराचा प्रवास केवळ गुणपत्रिका, निकाल किंवा शैक्षणिक उपक्रमांपुरता मर्यादित नसतो; विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणारी दिशा, त्यांच्या कलागुणांना मिळणारे व्यासपीठ आणि संस्थेच्या विविध उपक्रमांतून घडणारे व्यक्तिमत्त्व यामध्ये त्या प्रवासाचे खरे प्रतिबिंब दिसते. याच समृद्ध वाटचालीचे सर्जनशील दर्शन घडविणाऱ्या श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या ‘अंकुर’ वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित या महाविद्यालयाच्या ‘अंकुर’चे प्रकाशन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय ओंकार वाघ, व्हा. चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, ज्येष्ठ संचालक दादासाहेब डॉ. जयंतराव बी. पाटील, दादासाहेब खलील डी. देशमुख, आप्पासाहेब सतीष एन. चौधरी, दादासाहेब योगेश एम. पाटील, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव एस. वले, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सुनीता बी. गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘अंकुर’च्या पानांमधून विद्यार्थ्यांच्या लेखणीला मिळालेली भरारी आणि त्यांच्या कल्पनाशक्तीचे विविध पैलू प्रकर्षाने समोर येतात. कथा, कविता, वैचारिक लेख, विविध विषयांवरील लेखन, कलाविष्कार आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी यांसह राष्ट्रीय सेवा योजना तसेच महाविद्यालयातील विविध विभागांच्या वर्षभरातील उपक्रमांची नोंद या नियतकालिकात करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकाशन केवळ वार्षिक नियतकालिक न राहता महाविद्यालयीन जीवनातील विविध अनुभव, आठवणी आणि उपलब्धी यांचे जतन करणारे दस्तऐवज ठरले आहे. विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या सर्जनशीलतेला अभिव्यक्तीची संधी देणे, लेखनाची आवड विकसित करणे आणि विविध कलागुणांना प्रोत्साहन देणे, या दृष्टीने ‘अंकुर’चे महत्त्व अधोरेखित झाले. शिक्षणासोबतच साहित्य, कला, क्रीडा आणि सामाजिक जाणीव या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याच्या महाविद्यालयाच्या प्रयत्नांची झलकही यातून पाहायला मिळते. या वार्षिक नियतकालिकाचे संपादन मराठी विभागाचे प्रा. स्वप्नील वाय. भोसले यांनी केले आहे. प्रकाशन सोहळ्याप्रसंगी गो. से. हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, उपमुख्याध्यापक पी. एम. पाटील, महाविद्यालयाचे IQAC समन्वयक डॉ. शरद बी. पाटील, राजेंद्र पाटील, प्रा. स्वप्नील वाय. भोसले, डॉ. सुवर्णा आर. पाटील, प्रा. स्वप्नील एस. पाटील, डॉ. मेघा सी. गायकवाड, कार्यालय अधिक्षक नितीन पी. पाटील, राज जगताप यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ‘अंकुर’च्या प्रकाशनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त प्रतिभेला नवी दिशा देतानाच महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्षभरातील विविधांगी कार्याचा एक सुंदर आणि स्मरणीय ठेवा वाचकांसमोर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!