![]()
पाचोऱ्याच्या – मातीने स्वातंत्र्यलढ्याला अनेक ज्ञात-अज्ञात योद्धे दिले. त्यापैकी कै. बळीराम वेडू पाटील, रा. पाचोरा, यांचे जीवन म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावलेल्या एका निष्ठावंत स्वातंत्र्यसैनिकाची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांचा जन्म सन 1919 मध्ये नगरदेवळा येथे झाला. निश्चित जन्मतारीख उपलब्ध नसली तरी बालपणापासूनच कष्ट, संघर्ष आणि स्वाभिमान यांची शिकवण त्यांना घरातूनच मिळाली. नगरदेवळा येथे त्यांनी पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह माहिजी, ता. पाचोरा येथील कै. आनंदा धाकलू गायकवाड यांच्या कन्या रेशमाबाई यांच्याशी झाला. हा विवाह कै. दयाराम धाकलू गायकवाड यांनी जमविला. कै. बळीराम पाटील यांचे वडील कै. वेडू सखाराम पाटील यांनी वाघळी, ता. चाळीसगाव येथून नगरदेवळा येथे स्थलांतर करून शेती केली. मात्र भाऊबंदकीच्या त्रासामुळे त्यांना तेथील जमीनही विकावी लागली. वडिलांच्या निधनानंतर बळीराम पाटील यांनी नगरदेवळ्यात मित्रपरिवार उभा केला. चिंधा दोधु बिरारी, पंढरीनाथ धोंडूराम थेपडे, रामचंद्र बंडू जोशी, देवराम दोधा महाजन यांच्या सहवासातून त्यांच्या मनात राष्ट्रसेवेची ज्वाला अधिक प्रज्वलित झाली आणि गुलाम भारताला मुक्त करण्याच्या संघर्षात त्यांनी स्वतःला झोकून दिले. नगरदेवळ्याची शेती विकल्यानंतर त्यांनी पाचोऱ्यात देशमुखवाडी येथे घर घेतले. पुढे पाचोरा शिवारात देशमुखांकडून सुमारे 30 बिघे जमीन घेतली. आर्थिक अडचणी असतानाही गोडाऊनची जागा विकून शेती उभी केली, विहीर खोदली आणि चारमाही पिकांची सुरुवात केली. माहिजी नाक्यासमोर खळे उभारून गुरे, बैलजोडी व शेतीचे साहित्य सांभाळले. मात्र जुन्या वैरातून वाघळीकर भाऊबंदांनी कडव्याच्या गंजीला आग लावण्यापर्यंत त्रास दिला. तरीही संघर्षापुढे न झुकता त्यांनी मित्रपरिवाराच्या बळावर आपले सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य सुरूच ठेवले. स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक वळण मिळत असताना सुपडू भादू पाटील, राजाराम धनजी पाटील, सुखलाल रामनाथ गुप्ता, जगजीवन कैंशलचंद शेठ, लाभचंद जगजीवन शेठ, पंढरीनाथ धोंडूराम थेपडे, रामचंद्र बंडू जोशी यांच्यासह त्यांनी पाचोरा परिसरात जनजागृती सुरू केली. ब्रिटिश राजवटीत सामान्य जनतेला अन्नधान्याची टंचाई भासत होती. त्यामुळे गोपीचंद शेठ भारतीया यांच्या घरासमोरील जागेत धान्य दुकान सुरू करण्यात आले. मकाजी फैल भागातील नागरिकांसाठी मंदिराजवळही सरकारी धान्य दुकान उभारण्यात आले. सितारामभाई बिर्ला, सानेगुरुजी आणि के. गो. लेले काका यांच्या मार्गदर्शनानुसार चळवळीला व्यापक स्वरूप देण्यात आले. गावोगावी जाऊन सत्याग्रही तयार करणे, सभा घेणे, मिरवणुका काढणे आणि ब्रिटिश सत्तेविरोधात जनमत निर्माण करणे हे कार्य जोमाने सुरू झाले. सन 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनाने या संघर्षाला अधिक तीव्रता दिली. सुपडू भादू पाटील, राजाराम धनजी पाटील, लाभचंद जगजीवन पाटील, सुखलाल रामनाथ गुप्ता, रामचंद्र बंडू जोशी आणि पंढरीनाथ धोंडूराम थेपडे यांच्यासह कै. बळीराम पाटील यांना पाचोरा सब-जेलमध्ये अटक करण्यात आली. 15 दिवसांच्या कारावासानंतर सर्वांना धुळे कारागृहात पाठविण्यात आले. न्यायालयाने काहींना एक वर्ष, तर काहींना 11 महिन्यांची शिक्षा सुनावली. धुळे कारागृहातील दिवस हे त्यांच्या देशभक्तीची खरी कसोटी ठरले. कैद्यांना खडी फोडण्याचे कष्टाचे काम देण्यात आले. हात सुजले, शरीरावर व्रण पडले; निकृष्ट अन्न मिळाले. तरीही स्वातंत्र्याची आस त्यांच्या मनातून क्षणभरही ढळली नाही. कुटुंबीय भेटायला गेले असता या अमानुष परिस्थितीचे दर्शन झाले. महात्मा गांधी आणि सानेगुरुजी यांच्या संदेशांनी त्यांचा निर्धार आणखी दृढ केला. सन 1940 पासून विदेशी वस्त्रांवर बहिष्कार आणि स्वदेशीचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या घरी पेटीचे तीन चरखे आणण्यात आले. कापसापासून सरकी वेगळी करणे, धुनकनीने कापूस पिंजणे, वेळू तयार करणे आणि चरख्यावर सूत काढणे अशी संपूर्ण प्रक्रिया घराघरांत सुरू होती. तयार झालेल्या सुताच्या लड्या लाभचंद शेठ यांच्या माध्यमातून कासोदा, ता. एरंडोल येथे पाठवल्या जात आणि तेथून खादीचे कापड आणले जाई. बळीराम पाटील, रेशमाबाई आणि त्यांच्या मुलांनी स्वदेशीचा हा संस्कार प्रत्यक्ष जगला. पाचोऱ्यात महादेव मंदिरासमोर खादी भांडार सुरू करून विदेशी कापडाला पर्याय निर्माण करण्यात आला. भडगाव तालुक्यातील देवराम पा., अभिमान पाटील, नागो तात्या, पिंपळगावचे हरी तात्या, आमडदेचे आत्माराम अप्पा, गिरड येथील कार्यकर्ते तसेच वडगाव सतीचे येसाजी लुका चौधरी, जब्बारखा पठाण, अंतुर्ली, वडगाव आंबेचे, पहाण, ओझरचे सांडू पाटील, बाजीराव पाटील, सोनजी जिभाऊ, मन्साराम पाटील यांसारख्या कार्यकर्त्यांना चळवळीत सहभागी करून घेण्यात आले. नगरदेवळ्यात बापू तात्यांनी राष्ट्रीय कलापथक उभे केले. पोवाडे, स्फूर्तिगीते आणि जाहीर सभा यांच्या माध्यमातून खेडोपाडी स्वातंत्र्याचा संदेश पोहोचविला. गांधीचौक आणि आठवडे बाजारात रॉकेलच्या बत्त्यांच्या प्रकाशात सभा होत; ब्रिटिशांनी भारत सोडावा, अशा घोषणा घुमत. या चळवळीमुळे ब्रिटिश पोलिसांनी कार्यकर्त्यांविरुद्ध पकड वॉरंट काढले आणि अनेकांना भूमिगत व्हावे लागले. अशाच काळात बळीराम पाटील यांची प्रकृती खालावली. डॉ. कुळकर्णी डी.बी. आणि डॉ. बाबुराव जोशी यांनी उपचार करून जळगाव येथे शस्त्रक्रियेचा सल्ला दिला; मात्र त्यांनी तो स्वीकारला नाही. अखेर सन 1944 मध्ये दसऱ्याच्या दिवशी त्यांचे निधन झाले. एका कुटुंबाचा आधारच नव्हे, तर पाचोऱ्याच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक धगधगता दीप विझला. त्यांच्या निधनाने संपूर्ण पाचोरा शोकसागरात बुडाला. महात्मा गांधी आणि सानेगुरुजी यांची सांत्वनपर पोस्टकार्डे आली. सानेगुरुजी स्वतः त्यांच्या घरी आले आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. पुढेही त्यांनी शिक्षण सुरू ठेवण्याचा संदेश दिला. नानासो. राजाराम धनजी पाटील, लाभचंद जगजीवन शेठ, सुखलाल रामनाथ गुप्ता, बापू जोशी आणि इतर सहकाऱ्यांनी कुटुंबाला आधार दिला. विशेषतः कै. नानासाहेब राजाराम धनजी पाटील यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. कै. बळीराम वेडू पाटील यांचा इतिहास केवळ एका स्वातंत्र्यसैनिकाचा जीवनपट नाही; तो त्याग, स्वदेशी, सामाजिक बांधिलकी, अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि मातृभूमीवरील अखंड निष्ठेचा जिवंत दस्तऐवज आहे. स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्यांचे कार्य संपले नाही—तर पुढील पिढ्यांनी त्या बलिदानाची आठवण ठेवणे, हाच त्यांच्या राष्ट्रनिष्ठ जीवनाला खरा अभिवादनाचा मार्ग आहे. जयहिंद! जय भारत!
शब्दांकन – स्व. भिमराव बळीराम पाटील
( स्वातंत्र्य सैनीक वारसदार )





























