Breaking

पुणे-मुंबई डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्सप्रेसचे डबे वाढविण्यासाठी रेल्वे प्रवाशी संघटना आग्रही

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील फलाट क्र. १० आणि ११ ची लांबी वाढविण्यात येत असून, लांबी वाढल्याने सदर फलाटांवर सुमारे २३ डब्यांची रेल्वे थांबू शकणार आहे. पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेस या गाड्या पुणे-मुंबई दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमानी आणि व्यावसायिक प्रवाशांसाठी जीवनवाहिन्याच आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्याची

मागणी रेल्वे प्रवासी, पिंपरी-चिंचवड, पुणे संघटना सातत्याने करीत आहे. मात्र, फलाटांचे लांबीकरण झाल्यानंतर डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत होते. आता फलाटांची लांबी वाढणार असल्यामुळे डब्यांची संख्या वाढवून घ्यावी, यासाठी पासधारक प्रवाशांकडून संघटनेवर दबाव वाढत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली पुणे-मुंबई रेल्वे सेवा, प्रवासी संघटनेच्या आग्रही मागणीनुसार आणि महत्प्रयत्नांती पुन्हा सुरु झाली. या गाड्या दि. २२/३/२०२२ पासून नव्या स्वरुपात एल. एच.बी. सह सुरु केल्या आहेत. मात्र, डेक्कन क्वीन आणि सिंहगड या दोन्ही गाड्यांचे जनरल डबे कमी केल्यामुळे अनारक्षित तिकीटधारकांची प्रचंड गैरसोय होत आहे. डेक्कन क्वीन एक्सप्रेसला एकच जनरल डबा असल्यामुळे,

या डब्यामध्ये उभे राहाणे देखील मुश्कील होते. जागा न मिळालेले तिकीटधारक सहाजिकच आरक्षित किंवा मासिक पासधारक डब्यांमध्ये घुसतात आणि मासिक पासधारकांशी वाद घालतात आणि वादाचे पर्यवसन भांडणात होते. असे नित्याचेच झाल्यामुळे मासिक पासधारकांना तसेच आरक्षित तिकीटधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.वास्तविक, सिंहगड एक्सप्रेस मार्च, २०२० पर्यंत १९ डब्यांची, तर दि. २१/३/२०२२ पर्यंत १६ डब्यांची होती. सध्याची नवीन गाडी १४ डब्यांची असून २ जनरल डबे कमी करण्यात आले आहेत. तसेच डेक्कन क्वीन एक्सप्रेसचे १ जनरल आणि २ एस.एल.आर. डबे कमी करण्यात आले आहेत. पुणे-मुंबई मार्गावरील सर्व इंटरसिटी गाड्यांमध्ये मासिक पासधारक महिलांसाठी अर्धा डबा आरक्षित आहे, मात्र सिंहगड एक्सप्रेसमध्ये मासिक पासधारक महिलांसाठी स्वतंत्र डबा नाही, किमान अर्धा डबा मासिक पासधारक महिलांसाठी राखीव असणे गरजेचे आहे.या दोन्ही गाड्या प्रामुख्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आहेत. या दोन्ही गाड्यांचे जनरल डबे कमी केल्यामुळे, अनारक्षित तसेच आरक्षित तिकीटधारक आणी मासिक पासधारकांना अतिशय त्रासदायक होत आहेत. तरी, या दोन्ही गाड्यांना पूर्वीप्रमाणे जनरल डबे जोडावेत, अशी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड, पुणेचे सदस्य तसेच केंद्रीय रेल्वे पुणे रेल्वे विभाग सल्लागार समितीचे इक्बाल (भाईजान) मुलाणी यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here