मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शाहीर मधुकर नेराळे कायम कलावंतांच्या भल्यासाठी झगडत राहिले, त्यांच्या जाण्याने खर्या अर्थाने लोककला पोरकी झाली, अशा शब्दात नाटककार, पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी श्रद्धांजली वाहिली तर नेराळे यांच्या निधनाने लोककलेचा आधारवड हरपला, अशा भावना मुंबई विद्यापीठाच्या लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्रातील तमाशा लोककलेचे प्रेरणास्थान आणि कलावंताचे आधारवड शाहीर मधुकर नेराळे यांचे गेल्याच आठवड्यात ह्रदय विकारामुळे लालबाग चिवडा गल्लीतील न्यू हनुमान थिएटरच्या कार्यालयात वयाच्या ८१ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. तमाशा लोककलेचे तपस्वी ठरलेल्या मधुकर नेराळे यांच्या निधनाने कला विश्वात दुःखाचे वातावरण आहे. लालबाग येथील लोककलावंतांचे आधारवड ठरलेले न्यू हनुमान थिएटर एकाएकी पोरके झाले. त्याच ठिकाणी बुधवारी अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद, शाहिरी लोक कला मंच, ऑर्केस्ट्रा असोसिएशन, तिळवण तेली समाज आणि सर्वश्री नेराळे कुटुंबियांच्या वतीने शोकसभा पार पडली.
शाहीर मधुकर नेराळे कधी कलावंतात कला रुजविण्यात दंग झाले, तर कधी नवी संघटना उभी करण्यात मग्न राहिले, तर कधी निराश्रित कलावंताला सरकारी अनुदान मिळवून देण्यात व्यस्त राहिले. महाराष्ट्राच्या मातीची ओळख असलेल्या तमाशा लोककलेला तर मरणासन्न अवस्था निर्माण झालेली. तिला राज्याच्या कानाकोपर्यात दौरे काढून मधुकर नेराळे यांनी ऊर्जितावस्था निर्माण करून दिली. लालबाग येथील हनुमान थिएटर तर अनेक निराश्रीत कलावंताना आश्रयस्थान राहिले आहे, या सर्व आठवणींना कालच्या श्रद्धांजलीच्या सभेत अनेक मान्यवर नेत्यांनी आपल्या भाषणाद्वारे उजाळा दिला. सभेत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे विभागीय नगरसेवक अनिल कोकीळ, शिवाजी मंदीरचे संचालक रामिम संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, पत्रकार, मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नरेंद्र वाबळे, शाहीर कुमार वैराळकर, शाहीर देवानंद माळी, नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे, तमाशा कलावंत रेश्मा परितेक, राजश्री नगरकर आदी कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. संघराज रुपवते, शाहिरी लोक कला मंचचे अध्यक्ष शांताराम चव्हाण आणि मंचचे समन्वयक लेखक काशिनाथ माटल, लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार राजेंद्र सकसकर, दिलिप खोंड आदींनी उपस्थित राहून मधूकर नेराळे यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. शाहीरी लोककला मंचचे सरचिटणीस आणि प्रसिद्ध शाहीर मधु खामकर यांनी आयोजनात भाग घेऊन सभेचे सूत्रसंचालन केले. सर्वश्री मुन्ना, राजेश राजेंद्र मधूकर नेराळे यांचा श्रद्धांजली सभेत विशेष सहभाग राहिला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.