पाचोरा: दर महिन्याच्या १२ तारखेला वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा येथे नियमित मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित केले जाते. याच उपक्रमांतर्गत १२ डिसेंबर रोजी मोतीबिंदू तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात मोठ्या संख्येने रुग्णांची तपासणी करण्यात आली.
वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “गेल्या दोन वर्षांपासून नारायणराव मोहनराव नेत्रालय, नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरे नियमितपणे आयोजित करत आहोत. आतापर्यंत साधारणतः ७,००० लोकांची मोतीबिंदू तपासणी करण्यात आली आहे, तर १,२०० हून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.”
डॉ. पाटील यांनी पुढे सांगितले की, “वयस्कर लोकांमध्ये मोतीबिंदूचा त्रास सामान्यतः अधिक प्रमाणात दिसून येतो. परंतु, अनेक वेळा योग्य माहिती अभावी किंवा आर्थिक अडचणींमुळे हे रुग्ण उपचार घेऊ शकत नाहीत. आमच्या शिबिरांचा उद्देश गरजू लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवणे हा आहे. मोतीबिंदूची वेळेत तपासणी आणि शस्त्रक्रिया झाल्यास रुग्णांचे दृष्टीदोष दूर होऊ शकतात आणि त्यांचा जीवनमान सुधारतो.”
शिबिराच्या यशस्वितेसाठी वृंदावन हॉस्पिटल आणि नारायणराव मोहनराव नेत्रालय यांचे वैद्यकीय कर्मचारी, तांत्रिक तज्ज्ञ, तसेच स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरात आलेल्या रुग्णांना मोफत तपासणी, सल्ला, तसेच शस्त्रक्रियेसाठी पुढील उपचार पद्धतींची माहिती देण्यात आली.
डॉ. पाटील यांनी शेवटी जनतेला आवाहन केले की, “आपल्या परिसरातील गरजू वयस्कर माता-भगिनींना या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करा. दर महिन्याच्या १२ तारखेला होणाऱ्या या शिबिरात जास्तीत जास्त लोकांना पाठवावे, जेणेकरून त्यांच्या दृष्टीसमस्येचे समाधान करता येईल.”
मोतीबिंदू तपासणी शिबिराच्या माध्यमातून सुलभ आणि परवडणाऱ्या उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा वृंदावन हॉस्पिटलचा उपक्रम सामाजिक बांधिलकीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.