१० वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

पाचोरा – शहरातील भडगाव रोडवरील शक्तीधामजवळ एक हृदयद्रावक घटना घडली. ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडून एका १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रॅक्टर चालकाविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       प्राप्त माहितीनुसार पाचोरा शहरातील राजीव गांधी कॉलनीत राहणारे जितेंद्र गोसावी हे आपल्या पत्नी, दोन मुले व वृद्ध आईसह वास्तव्यास आहेत. त्यांचा मोठा मुलगा रुद्र जितेंद्र गोसावी (वय १०) हा कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयात इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होता. रुद्र हा एक हुशार, आनंदी व खेळकर स्वभावाचा मुलगा म्हणून शाळेत आणि परिसरात प्रसिद्ध होता.
१३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर रुद्र नेहमीप्रमाणे सायकलवर खेळण्यासाठी शक्तीधामजवळ गेला होता. मात्र, त्याच वेळी भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरला बघून त्याचा सायकलवरील तोल गेला. तोल जाऊन रुद्र थेट ट्रॅक्टरच्या मागील मोठ्या चाकाखाली सापडला. या भीषण अपघातात रुद्रचा डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. रुद्रच्या आई-वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या चिमुकल्या मुलाचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी हंबरडा फोडला. त्यांच्या दुःखाने उपस्थित लोकही भारावून गेले. रुद्रचा मृतदेह तातडीने रुग्णवाहिकेद्वारे पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तिथे वृद्ध आजीच्या आक्रोशाने साऱ्या उपस्थितांचे डोळे पाणावले.
पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला
या दुर्दैवी घटनेप्रकरणी जितेंद्र गोसावी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये ट्रॅक्टर चालक विजय उर्फ बबलू अशोक थोरात (रा. पुनगाव, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे हे करीत आहेत.
          या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळकरी मुलांसाठी वाहतुकीचे नियम पाळणे व वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शक्तीधाम परिसरातील रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
                  ही घटना पालक, शिक्षक व वाहनचालकांसाठी धडा आहे. आपल्या व समोरच्याच्या सुरक्षेसाठी वाहन चालकांनी काळजी घेणे, वाहनांचे नियंत्रण व सर्वानी वाहतूक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. अशा प्रकारच्या अपघातांमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते, हे विसरता कामा नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here