पाचोरा – प्रशासनिक सुधार आणि लोक शिकायत विभाग, भारत सरकारच्या कार्मिक, लोक शिकायत आणि पेंशन मंत्रालयामार्फत “गुड गव्हर्नन्स वीक” अंतर्गत “प्रशासन गाव की ओर” ही विशेष मोहीम दिनांक 19 डिसेंबर 2024 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून शासकीय सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पाचोरा तालुक्यात मंडळ स्तरावर नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा, प्रशासकीय अभिप्राय घेणे, शासकीय योजनांची माहिती देणे तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी विविध मंडळ मुख्यालयांवर विशेष लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10.00 वाजता पाचोरा, कुऱ्हाड खुर्द, गाळण बुद्रुक, नगरदेवळा बुद्रुक, नांद्रा, पिंपळगाव, लोहटार, वरखेडी बुद्रुक आणि शिंदाड येथे ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, अंगणवाडी सेविका तसेच बचत गटांच्या सदस्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडणार आहेत.या विशेष मोहिमेचा दुसरा टप्पा दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी पाचोरा तालुका स्तरावर साजरा होणार आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग यांच्या कार्यालयात सकाळी 11.00 वाजता लोकशाही दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय विधानसभा सदस्य किशोरआप्पा पाटील भूषविणार असून, तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुख या वेळी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या प्रलंबित अर्जांवर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर विविध शासकीय योजनांची माहिती देऊन नागरिकांना त्या योजनांचा अधिकाधिक लाभ कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन केले जाईल.या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायट्यांचे चेअरमन आणि पदाधिकारी, प्रगतीशील शेतकरी, मान्यवर पत्रकार, लाभार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.लोकशाही दिन हा नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा मजबूत करण्याचा एक महत्वपूर्ण उपक्रम असून, याद्वारे स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रशासनाशी थेट संवाद साधावा आणि आपल्या समस्या मांडून त्यावर उपाय शोधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.गुड गव्हर्नन्स वीकच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिकांमधील विश्वास आणि संवाद अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.