पाचोरा न.पा. प्रशासनातील घंटागाडी सेवांचा भोंगळ कारभार, नागरिक त्रस्त

0

पाचोरा – शहरातील नागरी स्वच्छतेसाठी स्थानिक नगरपालिका प्रशासनाकडून दरवर्षी नागरिकांकडून स्वच्छता कर आकारला जातो. मात्र, या स्वच्छता सेवांच्या अंमलबजावणीत प्रचंड त्रुटी असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. विशेषतः घंटागाडी सेवांमध्ये नागरिकांना सातत्याने समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

       घंटागाडी नागरिकांच्या घराजवळून दररोज जाणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात या गाड्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार येत नाहीत. अनेकदा दोन ते चार दिवसांच्या अंतराने गाडी येते, आणि ती आली तरी कोणत्याही निश्चित वेळेस येत नाही. यामुळे नागरिकांना आपला कचरा वेळेत गाडीत टाकण्याची अडचण निर्माण होते.                                                              .घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कारभारातही गंभीर त्रुटी असल्याचे दिसून येते. अनेक वेळा गाडीवर चालकासोबत कचरा गोळा करण्यासाठी सहकारी उपलब्ध नसतो. काही वेळा सहकारी उपलब्ध असले तरी ते आपले काम न करता गाडीच्या मागे चालणाऱ्या निरीक्षकाच्या भूमिकेत दिसतात. वृद्ध, महिला आणि लहान मुलांना कचरा गाडीत टाकण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागते.

             अजून एक गंभीर बाब म्हणजे, घंटागाड्यांचे स्पीकर बंद आहेत. त्यामुळे गाडी नेमकी केव्हा आली आणि केव्हा गेली, याची कोणतीही माहिती घरातील महिला वर्गाला मिळत नाही. परिणामी घराबाहेर ठेवलेला कचरा तसाच पडून राहतो. मात्र, हा कचरा उचलण्याची

तसदी चालकासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून घेतली जात नाही.

       घंटागाडी सेवांव्यतिरिक्त झाडू मारणे व गटार सफाई करणारे कर्मचारीही नियमितपणे काम करत नाहीत. दुसरा व चौथा शनिवार तसेच रविवार या दिवशी त्यांना अधिकृत सुटी नसतानाही कामावर गैरहजर राहिल्याचे प्रकार घडतात. संबंधित कर्मचाऱ्यांकडून गैरहजेरीला बेकायदेशीररित्या देऊन घेऊन  ‘अडजस्ट’ करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.                                                                     .नागरिकांवर स्वच्छतेचा कर आकारल्यानंतर त्यांना दर्जेदार सेवा पुरवणे हे नगरपालिकेचे प्राथमिक कर्तव्य आहे. मात्र, सद्यस्थितीत आरोग्य विभागाचे दुर्लक्ष व कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.                                                          .मुख्याधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालून घंटागाडी सेवांच्या नियमिततेसाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. तसेच, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, शिस्तबद्ध कामकाज व वेळापत्रकात सुधारणा करून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे अनिवार्य आहे. अन्यथा, स्वच्छतेच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या कराचे औचित्यच हरवेल, आणि नागरिकांच्या मनात प्रशासनाविषयी नकारात्मक भावना निर्माण होईल.                                                          .पाचोरा न.पा. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थापनाला हादरा बसत असून, यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here