पाचोरा – निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या 14 व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य व रंगतदार सोहळा नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण अनुभवण्यासाठी पालक व मान्यवरांनी प्रचंड गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी शाळेच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने करण्यात आली. सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आधारित नृत्य सादरीकरण केले. पारंपरिक, देशभक्तिपर आणि आधुनिक नृत्यप्रकारांनी उपस्थितांना चकित केले. रंगमंचावर सादर झालेल्या या विविध नृत्यप्रकारांनी पालक व पाहुण्यांचे भरभरून कौतुक मिळवले. विशेषतः विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणात विविध भाषांमधून सूत्रसंचालन केले, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळाच झगमगता माहोल मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आणि शिक्षकांच्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले. “विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच वाचन, वकृत्व, क्रीडा, नृत्य आणि गायन अशा कलात्मक उपक्रमांमध्येही पुढे यावे. या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक आहेत. तसेच, पालकांनी आपल्या मुलांना वेळ दिल्यास त्यांचा आत्मविश्वास व गुणवत्ता अधिक वाढू शकते,” असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
कार्यक्रमात निर्मल सीड्सचे महाव्यवस्थापक श्री. सुरेश पाटील, शाळेचे सचिव श्री. नरेंद्रसिंग सूर्यवंशी, उपाध्यक्ष श्रीमती कमलताई पाटील, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री. प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील आणि प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील हे मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. पालकांनी देखील या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले आणि त्यांनी आपली कला आत्मविश्वासाने सादर केली.
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. नृत्य, गायन, क्रीडा व सूत्रसंचालन अशा विविध प्रकारांमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास व कला कौशल्य वाढले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते आणि शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीची वचनबद्धता अधोरेखित होते.
या उत्साहपूर्ण स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात निर्मल इंटरनॅशनल स्कूलबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला. असे उपक्रम भविष्यातही विद्यार्थ्यांना प्रेरणा व संधी देणारे ठरणार आहेत.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.