पाचोरा – तालुक्यातील होळ येथील जिल्हा परिषद शाळेत विज्ञानविषयक पुस्तकांचे वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांचे ज्ञान वाढावे, आणि शैक्षणिक विकास साधावा या उद्देशाने या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण पाटील, मार्गदर्शिका योजनाताई पाटील, प्रमुख पाहुणे शरद पाटील, ऍड. अभय पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित मान्यवरांसोबतच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, तसेच अनेक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.सौ. वैशाली सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी लागावी, प्रयोगशील वृत्ती विकसित व्हावी आणि त्यांच्या भवितव्यासाठी आधुनिक ज्ञानाची जोड मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. योजनाताई पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती दिली व अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे नमूद केले. अरुण पाटील व शरद पाटील यांनी शाळेला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना नियमित वाचन व प्रायोगिक शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले.मुख्याध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक करताना शाळेला पुस्तकांच्या माध्यमातून झालेल्या योगदानाबद्दल आभार मानले. त्यांनी सांगितले की, विज्ञान शिक्षणाचा प्रसार हा ग्रामीण भागाच्या विकासासाठी अपरिहार्य आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक वृंद आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनीदेखील या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वितरणामुळे शाळेत नवीन ऊर्जा आणि प्रेरणा संचारल्याचे जाणवले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली. कार्यक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.