६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील मुंबई-३ केंद्राचे शानदार उद्घाटन

0

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित करित असलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या मुंबई-३ केंद्राच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे करण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पवार, सुप्रसिद्ध अभिनेते अरूण पालव, ज्येष्ठ रंगकर्मी तसेच साहित्य संघ मंदिरचे कार्यवाह सुभाष भागवत, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी मिलिंद बिर्जे, मच्छिंद्र पाटील तसेच परीक्षक रमाकांत भालेराव, विवेक खेर, प्रतिभा नागपुरे तेटू यांच्या शुभहस्ते तसेच उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन सायली साळवी यांनी केले.
६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी प्राथमिक फेरीमध्ये डॉ. तृप्ती झेमसे लिखित तसेच अभिषेक भगत दिग्दर्शित “कॅनिबल” या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. प्रेक्षकांनी प्रयोगाला हजेरी लावून कलाकारांना खूप छान दाद दिली.
स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई-३ केंद्रावर सुरू झाली असून ८ जानेवारी २०२५ पर्यंत या स्पर्धेमध्ये विविध २० नाटकांचे प्रयोग होणार आहेत. स्पर्धेमध्ये सामाजिक समस्या, राजकीय विषय, प्रेमकथा आणि इतर विविध विषयांवर आधारित नाटके सादर करणार आहेत.
सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने विकास खारगे, (भा.प्र.से.) अपर मुख्य सचिव तसेच बिभीषण चवरे, संचालक यांनी हौशी कलाकारांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे.
     तिकीट दर केवळ ₹१५/- आणि ₹१०/- आहे. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग होणार आहेत. सदर स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच “रंगभूमी डॉट कॉम” ह्या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकीट बुकींग करता येणार आहे. मुंबई केंद्राचे समन्वयक म्हणून राकेश तळगावकर आणि प्रियांका फणसोपकर हे काम पाहात आहेत.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here