पाचोरा – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास माध्यमिक विद्यालयात इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर आणि सुलेखन यावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दि. 26 व 27 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत पार पडलेल्या या कार्यशाळेला हस्ताक्षर मार्गदर्शिका सौ. सुवर्णा जितेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठीच्या महत्त्वाच्या तंत्रांची ओळख करून देण्यात आली. सुंदर हस्ताक्षर कसे असावे? पेन कसा धरावा? कोणता पेन वापरावा? कोणत्या प्रकारच्या वहीत सराव करावा? या प्रश्नांची सखोल उत्तरे सौ. सुवर्णा पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसचे, हस्ताक्षर सुधारण्यासाठी सरावाचे योग्य प्रकार कोणते आहेत, सराव करताना कोणत्या बाबींवर लक्ष द्यावे याविषयी त्यांनी विशेष मार्गदर्शन केले.
याशिवाय, सुलेखन म्हणजे काय? सुलेखनासाठी कोणकोणत्या साधनांची गरज असते? सुलेखनासाठी कोणते पेन किंवा रंग वापरले जातात? याविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी विविध प्रकारची सुलेखन नमुने विद्यार्थ्यांसमोर सादर केली, ज्यात वारली आर्टची उदाहरणेही समाविष्ट होती. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने हे सर्व अनुभवले व शिकले.
कार्यशाळेच्या वेळी विद्यार्थ्यांनी सौ. सुवर्णा पाटील यांच्याशी संवाद साधून आपल्या शंकांचे समाधान केले. या कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. तेली सर आणि उपप्राचार्य श्री. पी. ओ. चौधरी सर यांनी पुढाकार घेतला होता. या उपक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या लिखाण कौशल्याचा दर्जा सुधारण्यासाठी व लेखनकलेत रुची निर्माण होण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली. कार्यशाळेतील माहिती व प्रत्यक्ष मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलतेला चालना मिळेल व त्यांच्या बौद्धिक आणि कलात्मक क्षमतेत भर पडेल, असे शिक्षकांनी सांगितले.
ग्रामविकास माध्यमिक विद्यालयातील या यशस्वी उपक्रमाबद्दल सौ. सुवर्णा पाटील आणि सर्व शिक्षकवृंदांचे पालक व विद्यार्थ्यांकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.