सर रतन टाटा यांनी केले दैवत्वाचे परिमाण लाभलेले सेवाकार्य – नितीन कोलगे

0

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : निष्ठावान निरलस सेवाभावी उद्योगपती सर रतन नवल टाटा यांची स्मृती चिरंतन जागविण्यासाठी दक्षिण मुंबई कॅटरिंग संघातर्फे टाटा यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे रोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान कार्यक्रम परळच्या श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट येथे घेण्यात आला. त्याप्रसंगी ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त हेमंत सामंत, वृषाली सामंत, प्रमोद सावंत, दक्षिण मुंबई कॅटरिंग संघाचे अध्यक्ष नितीन कोलगे, हिंदू राष्ट्र सेना मुंबईचे अध्यक्ष प्रकाश सावंत, खाकी वर्दीतले कनवाळू विकास शेळके, शिवशंकर बामले, सामाजिक कार्यकर्ते साईनाथ रामपुरकर, विजय केदासे, विजय रायमाने, गीता दळवी, अविनाश सावंत, सुधीर हेगिष्टे तसेच राजेश मासावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
    बंधुभावाने केलेल्या सेवेपेक्षा आत्मभावाने केलेली सेवा ही सर्वोत्तम असते. नेमकी हीच सर्वोत्तम सेवा ‘श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट’ करत असते. ‘रुग्ण सेवा’ हीच धर्मशाळेची ओळख आहे  के ई एम, वाडिया, तसेच कर्करोगासाठी नामांकित असलेले टाटा रुग्णालयच नव्हे तर त्या परिसरातील रस्त्यांवरही ओझरता दृष्टिक्षेप टाकला तरी देशभरातून आलेल्या कर्करोगाग्रस्त व्यक्‍तींची अवस्था जीवाला अस्वस्थ करून जाते. या रुग्णांना मुंबईच्या रस्त्यांवर राहून टाटा इस्पितळात उपचार करावे लागतात. राहाणे, खाणे, इस्पितळात जाणेयेणे, औषधोपचार यावर अफाट आणि क्षमतेपलीकडे खर्च होतो. खर्चाच्या डोंगरात कुटुंबे उद्ध्वस्त होतात. अक्षरशः रस्त्यावर येतात. टाटा इस्पितळाच्या आजूबाजूला कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांचे काळजीने सुकलेले नातेवाईक ऊन-वारा-पावसात रस्त्यावर पथारी टाकलेले दिसतात. या सर्वांची सोय करता येणे शक्य नाहीच. पण या पार्श्‍वभूमीवर ‘श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट’ काम करत आहे. असे ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त हेमंत सामंत म्हणाले.
    सर रतन टाटा यांनी दैवत्वाचे परिमाण लाभलेले सेवाकार्य केले. त्यांच्या कार्याचा किंचितसा अंश करण्याची आम्हांला संधी लाभली हे आमचे भाग्य आहे. साधू आणि देव ओळखण्याचा एक संतविचार आपल्याकडे आहे तो म्हणजे- जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा। ते दैवत्व आणि साधूपण ‘श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट’ च्या सेवाकार्यात आणि विचारांत वसले आहे, असे उद्गार दक्षिण मुंबई कॅटरिंग संघाचे अध्यक्ष नितीन कोलगे यांनी काढले.
   कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना यानिमित्ताने सुग्रास जेवणाचा ‘स्वाद’ घेता आला. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अध्यक्ष नितीन कोलगे, संतोष शेट्ये, राजू  शिंदे, दिपक मोरे, विलास कासार, संतोष कोटकर, विनायक मुंज यांच्यासह “दक्षिण मुंबई कॅटरिंग संघ”च्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here