पाचोरा – जळगाव जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आज दि. 01 जानेवारी 2025 रोजी दुपारी 03:00 वाजता तहसीलदार पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली मौजे कुरंगी येथे ग्रामस्तरीय दक्षता समितीची बैठक पार पडली. या बैठकीस ग्रामपंचायत सरपंच श्रीमती मंगलाबाई पंढरीनाथ पाटील, उपसरपंच श्री. दिनकर सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री. आबासाहेब पाटील, मंडळ अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती जिज्ञासा पाटील, तत्कालिन ग्राम महसूल

अधिकारी श्री. नदीम शेख तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी श्री. नदीम शेख यांनी गावकऱ्यांना संबोधित करताना वाळू चोरीमुळे होणारे दुष्परिणाम अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, नदीतून वाळू काढल्यास पाण्याची पातळी खालावते, विहिरींचे पाणी कमी होते आणि याचा थेट परिणाम गावातील शेती व पिण्याच्या पाण्यावर होतो. यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. प्रशासन व गावकऱ्यांच्या एकत्रित

प्रयत्नांमुळे अवैध गौणखनिज उत्खनन रोखले जाऊ शकते.
ग्रामपंचायत सदस्य श्री. योगेश पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या बैठकीतील सूचनांचा उल्लेख करत वाळू चोरी रोखण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. त्यांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ग्वाही देत, “आजपासून कुरंगी गावातून वाळूचा एकही खडा चोरी होऊ देणार नाही,” असे स्पष्ट केले.
तहसीलदार पाचोरा यांनी उपस्थित ग्रामस्थांना वाळू चोरी विरोधी अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, वाळू चोरी रोखणे हे महसूल, पोलीस, परिवहन व ग्रामविकास विभाग यांची संयुक्त जबाबदारी आहे. गावकऱ्यांनी कोणतीही अनधिकृत वाळू वाहतूक आढळल्यास प्रशासनाशी तत्काळ संपर्क साधावा यासाठी त्यांनी आपला मोबाईल क्रमांकही दिला.
तहसीलदारांनी वाळू चोरीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकताना सांगितले की, यामुळे गुन्हेगारी वाढते, सार्वजनिक शांतता भंग पावते आणि अपघात तसेच व्यसनांचे प्रमाण वाढते. गावातील 123 जणांना यापूर्वीच चॅप्टर केसेस नोटीसा दिल्या असून प्रशासन अवैध वाळू उत्खनन विरोधात कठोर पावले उचलत आहे. धमकी दिली गेली तरीही प्रशासन ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीत गावकऱ्यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली. कुरंगी गावातून अवैध गौणखनिज वाहतूक होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
ही बैठक गावकऱ्यांच्या एकजुटीची व प्रशासनाच्या ठोस भूमिकेची साक्ष ठरली. पुढील काळात कुरंगी गाव वाळू चोरीमुक्त होईल, असा विश्वास या बैठकीने निर्माण केला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.