पाचोरा – दि. 4 जानेवारी 2025, शनिवार रोजी जय किरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पाचोरा येथे स्काऊट गाईडच्या माध्यमातून आयोजित ‘खरी कमाई’ (फन फेअर) हा उपक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाला. या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे महत्त्व समजावून देणे आणि त्यांना व्यवसायाच्या प्राथमिक संकल्पना समजून घेण्याचा अनुभव देणे हा होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या उपाध्यक्ष गिरीषजी कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. शाळेचे कमिटी चेअरमन लालचंदजी केसवानी, पार्थ गिरीष कुलकर्णी, श्रेयांस रितेश ललवाणी, पराग मोर, तसेच इतर मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमाचे अध्यक्षपद पार्थ गिरीष कुलकर्णी यांनी भूषवले.
फन फेअर उपक्रमात स्काऊट गाईडच्या 15 संघांनी सहभाग नोंदवला. मोर संघ, सिंह संघ, वाघ संघ, बिबट्या संघ, कोल्हा संघ, कोब्रा संघ, जिराफ संघ, झेब्रा संघ, चांदणी संघ, चाफा संघ, पारिजात संघ, निशिगंधा संघ, मोगरा संघ, कमळ संघ आणि गुलाब संघ यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.
प्रत्येक स्टॉलवर पाणीपुरी, वडापाव, भजे, भेळ, सोयाबीन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, आईस्क्रीम, नमकीन अशा चविष्ट पदार्थांची विक्री करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हे पदार्थ स्वतः तयार केले होते. त्यांनी विक्रीदर ठरवण्यापासून ग्राहकांशी व्यवहार करण्यापर्यंत सर्व जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घेतल्या.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मागणी आणि पुरवठा याचा समतोल कसा साधायचा, ग्राहकांशी कसे संवाद साधायचे, आणि उत्पन्नाचा हिशोब कसा ठेवायचा याचे प्रत्यक्ष शिक्षण मिळाले. तसेच व्यवसायिक कौशल्ये आणि व्यवहारज्ञान विकसित करण्यात या उपक्रमाचा मोलाचा वाटा राहिला.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. मान्यवर पाहुण्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिली आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांची माहिती घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या मेहनतीला दाद दिली.
स्काऊट मास्तर निवृत्ती तांदळे यांनी प्रत्येक संघनायकाचा परिचय मान्यवरांना करून दिला आणि त्यांचे कार्य समजावून सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील आणि सीईओ अतुल चित्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक किरण बोरसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक वाल्मीक शिंदे यांनी केले.
‘खरी कमाई’ फन फेअर हा उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ उद्योजकता शिकवणारा नव्हे, तर जीवन कौशल्ये, सहकार्य, आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाने जय किरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचे अनोखे उदाहरण निर्माण केले आहे.
हा उपक्रम शाळेतील शिक्षक, व्यवस्थापन, पालक, आणि विद्यार्थ्यांमध्ये नवीन उपक्रमांसाठी प्रेरणा निर्माण करणारा ठरला आहे. भविष्यात अशा प्रकारचे अनेक उपक्रम घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.