सुखी व्हायचं असेल तर विवेकाने जगा – ॲड. अतुल आल्मेडा

0

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार (पश्चिम) यांच्या मराठी विभाग आणि विवेक वाहिनीच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमात बोलताना वसईतील प्रख्यात वकील माननीय अतुल आल्मेडा म्हणाले,” विवेकी माणूस न्यायाने जगत असतो. तो इतरांनाही न्यायाने जगायला भाग पाडतो. सुखी व्हायचं असेल तर प्रत्येकाने विवेकाने जगायला हवे.”

शिक्षणामुळे माणसाच्या ज्ञानात जरूर भर पडते मात्र विवेकभावाने जगणे ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे असे प्रतिपादन होली क्रॉस माध्यमिक विद्यालयाचे माजी उपप्राचार्य आणि थोर विचारवंत फ्रान्सिस आल्मेडा यांनी केले. याप्रसंगी बोलताना ज्ञानदीप मंडळाचे सचिव अँड्र्यु लोपीस म्हणाले, “महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विवेक भावना शिकवली जाते. तेच महत्त्वाचे कार्य अनिस करत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो’. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. कविता आल्मेडा म्हणाल्या, ” आम्हाला आमच्या महाविद्यालयात असे अभिनव प्रदर्शन भरविता आले याबद्दल आणि त्याचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. महाविद्यालयाचे विद्यार्थी अंधश्रद्धा निर्मूलनात पुढाकार घेतील असे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक जगदीश संसारे यांनी केले तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोजा यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here