सध्या देशभरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. विविध भागांमधून आलेल्या घटनांमुळे सामान्य जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. काही ठिकाणी या घटना थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.
अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक झाले आहे.
पहाटेच्या वेळी एकट्याने फिरणे हे आता धोकादायक ठरले आहे. मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या लोकांवर अचानक हल्ला करत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. सकाळी फिरायला जाणाऱ्या व्यक्तींनी शक्यतो एकटे फिरणे टाळावे. जर बाहेर पडणे आवश्यक असेल, तर स्वतःसोबत काठी किंवा अन्य संरक्षणाचे साधन ठेवावे, असा सल्ला दिला जात आहे.
अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण कदाचित कोणीतरी संकटात असेल. अशा वेळी खिडकीतून बाहेर डोकावून पाहणे किंवा आवाजाचा स्रोत तपासणे हा आपला सामाजिक कर्तव्याचा भाग आहे.
गल्लीत कुत्र्यांची संख्या वाढण्यामागे नागरिकांनी टाकलेला उघड्यावरचा कचरा आणि खरकटे हे मुख्य कारण आहे. यामुळे कुत्र्यांना खाण्यासाठी खाद्य मिळते आणि त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणे आणि कचरा योग्य पद्धतीने टाकणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाकडून काही ठोस उपाय होताना दिसत नाहीत. सुप्रीम कोर्टाने मोकाट कुत्र्यांच्या व्यवस्थापनाबाबत अनेक स्पष्ट आदेश दिले आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, काही प्रकरणांमध्ये सरकार थेट सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांचे उल्लंघन करताना दिसते किंवा त्या निर्णयांचे पालन करत नाही. पण, मोकाट कुत्र्यांच्या संदर्भातील आदेश मात्र कारण म्हणून पुढे केले जातात.
या विसंगतीमुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आज जंगली हिंस्र प्राण्यांपेक्षा मोकाट कुत्र्यांची भीती नागरिकांमध्ये अधिक निर्माण झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांचे पालन करण्यात प्रशासन दुटप्पी भूमिका घेत असल्याचे दिसते, ज्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या काही ठळक घटनांवर नजर टाकली तर, मुंबईतील एका उपनगरात पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीवर कुत्र्यांनी हल्ला केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या व्यक्तीने स्वतःचा बचाव करताना मोठ्या प्रयत्नांची आवश्यकता भासल्याचे दिसते. पुण्यातील एका घटनेत एका महिलेवर हल्ला झाल्याने ती गंभीर जखमी झाली. ग्रामीण भागात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोकाट कुत्र्यांचे प्रमुख लक्ष्य ठरत आहेत.
अशा घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी स्वतःच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. पहाटे किंवा रात्री बाहेर पडताना सतर्क राहणे, संरक्षणासाठी काठी किंवा इतर साधने सोबत ठेवणे, आपल्या लहान बालकांना परिसरात एकटे न सोडणे परिसरातील कुत्र्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि वेळोवेळी स्थानिक प्रशासनाला माहिती देणे हे आवश्यक झाले आहे.
प्रशासनाने कुत्र्यांची नसबंदी करणे, त्यांच्यासाठी निवारा केंद्रे उभारणे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे पालन करून नागरिकांना संरक्षण देणे किंवा मे सुप्रीम कोर्टाच्या निर्णय व आदेशाच्या विरोधात अपील दाखल करून जनतेचे जीवन महत्त्वाचे की बेवारस कुत्र्यांचे संरक्षण महत्त्वाचे यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना तातडीने हाती घ्याव्या लागतील. मात्र, या प्रक्रियेत नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरात स्वच्छता राखणे आणि मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर जागरूक राहणे गरजेचे आहे.
प्रशासन आणि नागरिकांनी सामूहिक प्रयत्न न केल्यास मोकाट कुत्र्यांचा धोका आणखी वाढू शकतो. सतर्कता आणि सावधगिरी हीच आपले संरक्षण करण्याची पहिली पायरी आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचा योग्य तो आदर ठेवून सन्मानाने मे सुप्रीम कोर्टास बेवारस कुत्र्यांबाबत सत्य परिस्थिती समोर आळणी गरजेचे आहे यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत, अन्यथा नागरिकांचे जीवन आणखी कठीण होईल. म्हणूनच, नागरिकांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अधिक जबाबदारीने वागण्याची वेळ आली आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.