![]()
भडगाव – तालुक्यातील मौजे अंजनविहिरे येथे कार्यरत असलेले सहाय्यक कृषी अधिकारी सुखदेव गिरी यांची बदली झाल्याने २८ फेब्रुवारी रोजी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. मात्र ही केवळ एक शासकीय प्रक्रिया न राहता, अंजनविहिरे गावासाठी तो एक भावनिक क्षण ठरला. गावातील समस्त शेतकरी बांधवांनी एकत्र येत सुखदेव गिरी यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भव्य आणि अभूतपूर्व निरोप समारंभाचे आयोजन केले. प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्यासाठी गावकऱ्यांनी इतक्या प्रेमाने, उत्साहाने आणि आपुलकीने निरोप देण्याची घटना विरळाच म्हणावी लागेल. गावकऱ्यांच्या मनात सुखदेव गिरी यांच्याविषयी असलेले प्रेम आणि आदर या समारंभातून ठायीठायी दिसून आला. सुखदेव गिरी यांची सपत्नीक डीजेच्या गजरात अश्वरथातून गावभर मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक घरासमोर महिलांनी रांगोळी काढून औक्षण केले, ओवाळणी टाकून त्यांचे स्वागत केले. हजारो रुपयांची ओवाळणी ही केवळ आर्थिक मूल्याची नव्हती, तर ती शेतकऱ्यांच्या मनातील कृतज्ञतेची आणि विश्वासाची पावती होती. महाडीबीटी योजनेच्या माध्यमातून अनुदानावर शेतकऱ्यांना मिळवून दिलेले २५ ते ३० ट्रॅक्टर या मिरवणुकीत सहभागी झाले. हे ट्रॅक्टर केवळ वाहन नव्हते, तर शेतकऱ्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलाचे प्रतिक होते. मिरवणुकीनंतर संपूर्ण गावाला गावकऱ्यांनीच स्नेहभोजन दिले आणि हा निरोप समारंभ एका कुटुंबीयाच्या विदाईसारखा साजरा केला. या समारंभास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मा. कुर्बान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी मा. किशोर मांडगे, तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने सुखदेव गिरी यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या भाषणांतूनही एक गोष्ट ठळकपणे जाणवत होती—सुखदेव गिरी हे केवळ आदेश देणारे अधिकारी नव्हते, तर शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांच्या दारात जाणारे, त्यांच्या पिकांत उतरून काम करणारे अधिकारी होते. हा निरोप समारंभ म्हणजे गावाच्या कृषी अधिकाऱ्याप्रती असलेल्या प्रेमाचे आणि विश्वासाचे जिवंत उदाहरण ठरले. सुखदेव गिरी यांनी आपल्या कार्यकाळात घरोघरी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, शासकीय योजनांची माहिती दिली, कागदोपत्री अडचणी सोडवल्या आणि शेतीला नवी दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. नोकरी करत असताना पगार मिळवणे हे प्रत्येकाचे ध्येय असते, मात्र आपण जो पगार घेतो त्याच्या बदल्यात समाजासाठी काय योगदान दिले, हे अधिक महत्त्वाचे असते. आपण आयुष्यात किती संपत्ती कमावली यापेक्षा, किती माणसे जिंकली याची खरी किंमत असते, हे सुखदेव गिरी यांच्या कार्यातून दिसून आले. आजच्या व्यवस्थेत एकीकडे रंजले-गांजले, वृद्ध, अपंग आणि त्रस्त लोकांना किरकोळ कामासाठी तासन्तास उभे ठेवणारे, महिनोन्महिने चकरा मारायला लावणारे अधिकारी-कर्मचारी आपण पाहतो. तर दुसरीकडे पगार घेऊनही हरामाचा पैसा कमवण्यासाठी लोकांचे लाचरूपी रक्त शोषणारे राक्षसी वृत्तीचे घटकही प्रशासनात कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला जेव्हा ग्रामस्थांकडून अशी ‘पावती’ मिळते, तेव्हा त्याचा आनंद आणि समाधान शब्दात मांडणे कठीण असते. या समारंभातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे सुखदेव गिरी यांची सहपत्नी त्यांच्या सोबत मिरवणुकीत विराजमान होत्या. आपल्या पतीच्या कार्यामुळे जनतेकडून मिळणारा मान-सन्मान, प्रेम आणि आदर पाहून त्या माऊलीच्या मनात जो अभिमान दाटून आला असेल, तो शब्दांत सांगण्यासारखा नाही. एका बाजूला प्रामाणिक कार्यामुळे निघणारी मिरवणूक आणि सन्मान, तर दुसऱ्या बाजूला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकून घराची झाडाझडती होताना कोपऱ्यात बसून रडणारी भ्रष्ट अधिकाऱ्याची पत्नी—या दोन टोकांच्या चित्रांतून जीवनाचे खरे मूल्य स्पष्ट होते. याच संदर्भात संत तुकाराम महाराजांचे शब्द आठवतात—“ज्याचे आचरण त्याचे भूषण.” पद, अधिकार किंवा सत्ता तात्पुरती असते; मात्र आचरणातून निर्माण होणारी कीर्ती आणि सन्मान कायमचा असतो. लेखक ग.दि. माडगूळकर यांनी म्हटल्याप्रमाणे, “माणूस मोठा त्याच्या कर्तृत्वाने होतो, पदाने नाही.” सुखदेव गिरी यांनी आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध करून दाखवले. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, जीवनात आपण किती दिवस जगलो याला फारसे महत्त्व नाही, तर आपण कसे जगलो, कोणासाठी जगलो आणि समाजासाठी काय दिले, याला खरे महत्त्व आहे. अंजनविहिरे गावाने दिलेला हा निरोप केवळ एका अधिकाऱ्याचा सत्कार नाही, तर प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकी यांचा सन्मान आहे. सुखदेव गिरी यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.







