पाचोरा, जि. जळगाव – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली; महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई; जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव; तसेच तालुका विधी सेवा समिती पाचोरा आणि पाचोरा वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “न्यायालय आपल्या दारी” या संकल्पनेवर आधारित विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजना महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम रविवार, १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता निर्मल इंटरनॅशनल स्कूल, अंतुर्ली, भडगाव रोड, पाचोरा येथे संपन्न होणार आहे.
या उपक्रमाच्या अनुषंगाने दि. १३ जानेवारी रोजी पाचोऱ्यातील दिवाणी न्यायालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत या महाशिबिराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी दिवाणी न्यायाधीश मा. जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश मा. एस. व्ही. निमसे, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती जी. एस. बोरा, तालुका वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील आणि इतर वकील बांधव उपस्थित होते. पत्रकार परिषदेत मा. जी. बी. औंधकर यांनी या कार्यक्रमाच्या स्वरूपाचा आढावा घेत न्यायालयीन यंत्रणांद्वारे सामान्य नागरिकांपर्यंत न्याय व शासकीय योजनांचा लाभ कसा पोहोचवता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
“न्यायालय आपल्या दारी” ही संकल्पना समाजातील प्रत्येक घटकाला न्यायव्यवस्थेचा आणि शासकीय सेवांचा लाभ सहजपणे मिळवून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. शासनाच्या “शासन आपल्या दारी” योजनेच्या धर्तीवर तयार केलेल्या या उपक्रमामुळे वंचित आणि गरजू नागरिकांना कायदेशीर सल्ला, मदत आणि शासकीय योजनांची माहिती एका ठिकाणी मिळू शकणार आहे.
महाशिबिराच्या उद्घाटनासाठी उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाचे सन्माननीय पालक न्यायमूर्ती श्री. मंगेश एस. पाटील आणि सन्माननीय पालक न्यायमूर्ती श्री. अभय एस. वाघवसे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगावचे अध्यक्ष मा. श्री. एस. क्यु. एस. एम. शेख असणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी आयुष प्रताप सिंह, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि महाराष्ट्र बार कौन्सिलचे पालक सदस्य अॅड. अमोल सावंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या महाशिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारले जातील, जिथे नागरिकांना शासकीय योजनांविषयी माहिती, अर्ज प्रक्रिया, आणि लाभ मिळविण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसंबंधी मार्गदर्शन केले जाईल. महसूल, कृषी, वीज, आरोग्य, शिक्षण, परिवहन, आणि पालिका विभागासह विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी नागरिकांना थेट संवादाद्वारे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपस्थित राहतील.
महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या महाशिबिरात नागरिकांना वीज बिल सवलत, कृषी अनुदान, शिक्षणविषयक योजना, महिलांसाठी आरोग्य व कल्याण योजना, दिव्यांग सेवांसारख्या अनेक योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा व तालुक्यातील विविध न्यायाधीश, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि आरटीओ यांसारखे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ सोप्या पद्धतीने देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
महाशिबिराचा उद्देश हा प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजना आणि न्यायालयीन सहाय्य पोहोचवणे हा आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महाशिबिराबाबत अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी तालुका विधी सेवा समितीचे सदस्य, वकील संघाचे प्रतिनिधी किंवा शासकीय विभागांशी संपर्क साधावा.
या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना न्यायालयीन व शासकीय सेवांचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.