पाचोरा – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गरीब व गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकली वाटप करण्यात आल्या. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थिनींच्या शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी विद्यार्थिनींना सायकल वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थी विकास निधीतून सुमारे 80,000 रुपयांच्या सायकलींची व्यवस्था करण्यात आली.
सकाळी ध्वजारोहण कार्यक्रमाच्या शुभारंभाने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर झालेल्या विशेष समारंभात 20 गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकली वितरित करण्यात आल्या. विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. प्रवासाची गैरसोय दूर होऊन शिक्षणाच्या प्रवासाला आता गती मिळणार असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.
या उपक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी महाविद्यालयाच्या कार्याची प्रशंसा केली. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, मानद सचिव ॲड. दादासाहेब महेश देशमुख, व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही.टी. जोशी, ज्येष्ठ पत्रकार व माजी पर्यवेक्षक प्रा. सी.एन. चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य वासुदेव वले, डॉ. जे.व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जी.बी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. एस.एस. पाटील तसेच संस्थेचे सर्व संचालक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थिनींच्या शिक्षणात खंड पडू नये आणि त्यांना प्रवासासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी महाविद्यालयाने हा उपक्रम राबवला. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धांचे पारितोषिक वितरणही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या विद्यार्थीहितकारक कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संस्था नेहमीच सजग आहे.”
या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनीही भरभरून कौतुक केले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी नेहमीच झटत असते. प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी राबवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.