मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याच्या पत्नीचे योगदान महत्त्वाचे ठरते, असे म्हणतात, तेच खरे आहे, कारण ख्रिस्तीवासी शाहीर प्रभाकर रामचंद्र साळवी यांचा मरणोत्तर गुणगौरव त्यांच्या पत्नीच्या जन्मदिनी होत आहे, हा अलौकिक आणि अपूर्व योग आहे. शाहीर प्रभाकर साळवी यांच्या पश्चात श्रीमती शारदा साळवी यांनी अनेक कौटुंबिक अडचणी झेलत परिवाराला सुखाचे जीवन प्राप्त करुन दिले. सामाजिक जडणघडणीत दिव्याप्रमाणे त्या अहोरात्र जळत राहिल्या, अशा शब्दांत आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांनी श्रीमती शारदा यांचा ८० व्या जन्मदिनी गुणगौरव केला.शाहीर साबळे, अमरशेख आणि शाहीर खामकर यांच्या पिढीतील ख्रिस्तीवासी शाहीर प्रभाकर साळवी यांनी लोककला जोपासताना सामाजसेवेचे व्रत पूर्ण केले, म्हणूनच त्यांना ख्रिस्ती समाजाच्या वतीने मरणोत्तर समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. तो मानाचा पुरस्कार त्यांच्या पत्नी शारदा प्रभाकर यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या औचित्याने आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शारदा प्रभाकर साळवी यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.
आमदार डॉ. ज्योती गायकवाड ख्रिस्तीवासी शाहीर प्रभाकर साळवी यांच्या स्मृतींना उजाळा देताना म्हणाल्या, शाहीर प्रभाकर साळवी यांनी शाहिरी लोककले बरोबर माणूसपण जपले, म्हणूनच त्यांचे मोठेपण समाजात कायम राहीले.कार्यक्रमाला शाहिरी लोककला मंचचे अध्यक्ष शांताराम चव्हाण, कोषाध्यक्ष ज्येष्ठ संगीतकार महादेव खैरमोडे, ज्येष्ठ लेखक, पत्रकार काशिनाथ माटल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर सॅमसन बळीद होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेंजामिन काकडे यांनी केले. सुधीर प्रभाकर साळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले. विल्सन शिंदे, संदेश उन्हावणे, संदेश सांगळे, अरुण थोरात, सुमित पटेकर, फिलिप बळीद, अनुश थोरात आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रतिष्ठीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.