मिरज (गुरुदत्त वाकदेकर) : गोवा येथील जगप्रसिद्ध बिग फूट म्युझियम आणि संग्रहालयामध्ये मिरज येथील प्रसिद्ध चित्रकार डॉ. अनिल दबडे यांचे पेंटिंग (कॅरीकेचर) कायमस्वरूपी लावण्यात आले आहे. बिग फूट हे म्युझियम मडगाव गोवा जवळ लोटोलिम येथे आहे.
गेली ४० वर्षे हे संग्रहालय पर्यटकांचे आवडते केंद्र बनलेले आहे. अकरा एकरामध्ये पसरलेल्या या म्युझियममध्ये जुन्या गोव्यातील पारंपारिक व्यवसायाचे शिल्पकाम पाहता येते. विशेष महत्त्वाचे म्हणजे बिग फूट म्युझियमचे सर्वेसर्वा ज्यूसलीन अलवारिस यांनी पूर्ण आयुष्य या म्युझियमसाठी समर्पित केले आहे. त्यांच्या प्रयत्नातून हे संग्रहालय जगप्रसिद्ध झाले आहे. म्युझियम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी परशुराम यांची पावले देखील या प्रदर्शनात पाहता येतात.

अलवारिस यांनी संत मीराबाईंचे शिल्प पंधरा दिवसांत रात्रंदिवस केवळ हातोडी आणि छन्नीच्या साह्याने तयार केले आहे. याची नोंद लिम्का आणि इंडिया रेकॉर्डने घेतली आहे. गोव्यावर राज्य करणाऱ्या पोर्तुगीजांपासून गोव्याचे पारंपारिक व्यवसाय व रीती रिवाज या प्रदर्शनामध्ये दाखवलेले आहेत.
चित्रकार डॉ. अनिल दबडे यांचा २५ देशांचा प्रवास झाला असून, बेल्जियम, दक्षिण आफ्रिका, सीसल्स येथील शासनाच्या लायब्ररीमध्ये दबडे यांची व्यंगचित्राची पुस्तके पाहता येतात. शरद पवार, अशोक सराफ, दिलीप कुमार अशा मोठ्या नेत्यांसह सीशेल देशाचे पंतप्रधान, भारतातील इतर राज्यातील नेतेमंडळी, तसेच देशभरातील विविध ठिकाणी दबडे यांची पेंटिंग्स आहेत. बिग फूट म्युझियममध्ये दबडे यांच्या पेंटिंगला मानाचे स्थान मिळाले असून, त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.