जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव २०२५: मुंबई केंद्राने रचला नवा इतिहास

0

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगांव आयोजित जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव २०२५ अमर हिंद मंडळाच्या सहयोगाने अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाला. गेल्या २२ वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाटककार पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रभर केले जाते. यावर्षी मुंबई केंद्रातील आयोजन अंमर हिंद मंडळाच्या सभागृहात केले गेले.

महोत्सवात ४० कलाकारांनी अप्रतिम वाचन सादर केले. प्रा. मानसी देशमुख (नाशिक) आणि मंडळाचे कार्याध्यक्ष आणि लेखक दिग्दर्शक दत्तात्रय सावंत यांनी या महोत्सवाचे परीक्षण केले. स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण मंडळाचे विश्वस्त अरूण देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवात सर्वसाधारणपणे प्रत्येक केंद्रातून एक संघ अंतिम फेरीत प्रवेश करतो, परंतु मुंबई केंद्रातून २ संघांना अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे. अंतिम फेरी २२ आणि २३ फेब्रुवारीला चाळीसगांव येथे होणार आहे.

महोत्सवात प्रथम क्रमांक मोडक-तोडक नाट्यसंस्था, लेखक – अशोक मानकर यांनी मिळवला. या संघाने रोशन मोरे, सागर कदम, शिवराम गावडे, रुपाली तावडे, वैष्णवी साखरे यांच्याद्वारे अप्रतिम अभिवाचन सादर केले. द्वितीय क्रमांक करार मुंबई संघाने मिळवला, त्यांनी कथा आसमानी सुलतानी आणि गाढवलाला सादर केली. विनित मराठे आणि समीर दळवी यांनी कथेचे प्रभावी अभिवाचन केले.

यावेळी मंडळाचे कोषाध्यक्ष व संयुक्त कार्यवाह यांनी स्पर्धेला भेट दिली. तेजल देशपांडे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखाचे माहितीपर वाचन केले. महोत्सवाच्या आयोजनात समीर चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले, त्याबद्दल आयोजकांतर्फे प्रमुख कार्यवाह व संपूर्ण कार्यकारिणीने त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here