शेंदुर्णी – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथे ‘शेंदुर्णी सेकंडरी को-ऑपरेटिव्ह सोसायटी’चा अमृत महोत्सव, ‘अमृत गौरव ग्रंथ प्रकाशन’, शेतकरी मेळावा आणि नूतन इमारतीच्या पायाभरणीचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या, तर विकासकामांचेही उद्घाटन केले. या दौऱ्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची आशा निर्माण झाली आहे.
शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार संजय कुटे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, स्थानिक नेते डॉ. सागरदादा गरुड, आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यामुळे शेंदुर्णीच्या भूमीवर विकासाचे नवे अध्याय लिहिले जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली. “सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी कापूस खरेदी बंद झाल्यामुळे चिंतेत होते. फडणवीस यांच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
“राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे हे आमचे प्राधान्य आहे. वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या 15 दिवसांत जोडणी मिळेल आणि इतर शेतकऱ्यांना मागणी नोंदवल्यानंतर दोन महिन्यांच्या आत जोडणी दिली जाईल,” असेही त्यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विकासकामांचे विशेष कौतुक केले. “जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गिरीशभाऊंनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज शेंदुर्णी येथे अमृत गौरव ग्रंथ प्रकाशनासारखा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि युवकांसाठी त्यांनी सुरू केलेले प्रकल्प कौतुकास्पद आहेत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
ना.गिरीशभाऊ महाजन यांनीही आपल्या भाषणात शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, “जळगाव जिल्ह्याचा विकास आणि शेतकऱ्यांचे हित हेच माझे ध्येय आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन सुविधा आणि योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या योगदानाची आठवण करून दिली. “चक्रधर स्वामींचे वास्तव्य लाभलेली ही भूमी आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात गजाननराव गरुड यांनी गावातील मुलामुलींसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ही संस्था स्थापन केली. अनेक विद्यार्थ्यांनी या संस्थेतून घडून आपले नाव मोठे केले आहे. बापूसाहेब गरुड हे बहुभाषिक, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सरपंचपदापासून ते विधानसभा उपाध्यक्षपदापर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटवला,” असे सांगत त्यांनी संस्थेच्या कार्याला सलाम केला.
नूतन इमारतीबद्दल त्यांनी म्हटले की, “ही नवी इमारत पर्यावरणपूरक असून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा प्रदान करेल. या भागाचे चित्र बदलण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी सौर फिडर प्रकल्प वेगाने सुरू असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले, “2026 पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी सौर फिडरचे काम प्रगतिपथावर आहे. शेतकऱ्यांचा माल कोणत्याही परिस्थितीत पडू दिला जाणार नाही, त्याची खरेदी करण्यात येईल.” या घोषणेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शेंदुर्णी नगरपंचायतीच्या नगरोत्थान योजनेंतर्गत मलनिस्सारण प्रकल्प आणि रस्त्यांच्या कामांचेही उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पांमुळे शेंदुर्णी शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेताना पुढील योजनांची माहिती दिली. विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या दौऱ्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवी उमेद मिळाली असून विकासाची नवी दिशा ठरवली गेली आहे. शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवाने शिक्षण आणि संस्कृतीच्या वारशाला उजाळा दिला, तर नवे प्रकल्प जिल्ह्याच्या प्रगतीचा आधार बनणार आहेत.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.