ऐनपूर – येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘संविधान गौरव महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा महोत्सव महाविद्यालयातील समान संधी केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
संविधान जनजागृतीचा भाग म्हणून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘भारतीय राज्यघटनेने आम्हास काय दिले?’ या विषयावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत महाविद्यालयातील ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्कांवर, सामाजिक समतेवर, धर्मनिरपेक्षतेवर तसेच लोकशाहीच्या बळकटीकरणावर आपले विचार प्रभावीपणे मांडले. काही विद्यार्थ्यांनी संविधानातील तरतुदींमुळे समाजातील वंचित घटकांना मिळालेल्या संधींवर प्रकाश टाकला, तर काहींनी देशाच्या सर्वांगीण विकासात संविधानाचे योगदान अधोरेखित केले.
‘जागर संविधानाचा’ या विषयावर घेण्यात आलेल्या बहुपर्यायी स्वरूपाच्या वस्तुनिष्ठ स्पर्धा परीक्षेत ६६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या परीक्षेतील प्रश्न संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी, राज्यघटनेतील विविध अनुच्छेद, घटनादुरुस्त्या तसेच संविधान निर्मितीच्या प्रक्रियेवर आधारित होते. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने या परीक्षेत सहभाग घेतला आणि आपले संविधानविषयक ज्ञान सिद्ध केले.
या उपक्रमांचे आयोजन समान संधी केंद्राचे समन्वयक प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी केले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. एस. एस. साळुंखे, प्रा. डॉ. नरेंद्र मुळे, डॉ. पी. आर. गवळी, डॉ. रेखा पी. पाटील, डॉ. व्ही. एन. रामटेके, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी, प्रा. अक्षय महाजन तसेच श्री. श्रेयस पाटील, श्री. सौरभ पाटील, श्री. हर्षल पाटील यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.
संविधान गौरव महोत्सव अंतर्गत पुढील आठवड्यात विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानांमध्ये संविधानातील विविध पैलूंवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेचे सखोल ज्ञान मिळेल तसेच संविधानाचे महत्त्व समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळेल. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी विद्यार्थ्यांना या व्याख्यानांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधानाबद्दल अधिक माहिती मिळवण्याचे आणि त्याद्वारे समाजात संविधान जनजागृतीस हातभार लावण्याचे आवाहन केले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.