ऐनपूर – येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) एककाच्या वतीने ‘माय भारत’ पोर्टलविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना डिजिटल युगातील संधींशी जोडण्यासाठी विशेष आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे नेतृत्व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली, ज्यामध्ये सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एस. बी. पाटील यांनी ‘माय भारत’ पोर्टलची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी पोर्टलचा उद्देश, त्याचे कार्यप्रणाली, तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींचे महत्व विशद केले. ‘माय भारत’ पोर्टल हे शिक्षण, रोजगार आणि स्वयंपूर्णतेसाठी एक प्रभावी व्यासपीठ आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रा. डॉ. डी. बी. पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. त्यांनी विशेषतः शेतीविषयक प्रायोगिक शिक्षण कार्यक्रम (ELP) आणि डिजिटल पिक सर्वेक्षण याविषयी सखोल माहिती दिली. ‘माय भारत’ पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ई-केवायसी प्रक्रियेचा डिजिटलकरणात होणारा उपयोग, शेतीविषयक नवकल्पना आणि कृषी व्यवसायातील संधी यांची सविस्तर माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्रा. डॉ. जे. पी. नहते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आजचा तरुण हा उद्याचा भारत असल्याचे सांगत ‘माय भारत’ पोर्टल हे तरुणांना व्यवसाय, सरकारी विभाग आणि स्वयंसेवी संस्थांशी जोडण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ असल्याचे नमूद केले. या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्थानिक समुदायाच्या समस्यांची जाणीव होईल आणि त्यांनी समाजोपयोगी उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा अवसरमल हिने केले, तर आभार प्रदर्शन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
‘माय भारत’ पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नाही, तर व्यावसायिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याची सुवर्णसंधी मिळते. त्यामुळे या पोर्टलचा वापर करून विद्यार्थी स्वतःला सक्षम करू शकतील, असे मार्गदर्शनही उपस्थित तज्ज्ञांनी केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.