चोपडा – मैत्री आणि सेवेचा विचार कृतीतून रुजविणारी चळवळ म्हणून रोटरी क्लब आज जगभर परिचित आहे. सामाजिक बांधिलकी आणि गरजांवर आधारित प्रकल्प हाती घेऊन कार्य करणाऱ्या चोपडा रोटरी क्लबने गेल्या ५४ वर्षांत उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्य केले आहे. या सेवाभावी कार्यामुळे हा क्लब इतर क्लबसाठी प्रेरणादायी ठरत आहे, असे गौरवोद्गार रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रोटे. राजिंदर खुराणा यांनी काढले. त्यांनी चोपडा क्लबचे मनःपूर्वक अभिनंदन करीत क्लबच्या ५४ व्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रांतपाल खुराणा यांनी चोपडा रोटरी क्लबला भेट दिली. त्यांच्या स्वागतासाठी हॉटेल निलांजन येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी रोटरी सदस्यांशी


संवाद साधत क्लबच्या कार्याचा आढावा घेतला. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर क्लब असेंबलीमध्ये सर्व बीओडी मेंबर्स, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स आणि सदस्यांच्या उपस्थितीत प्रांतपाल खुराणा यांनी क्लबच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती जाणून घेतली आणि मार्गदर्शन केले. त्यांनी क्लबच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत नवीन उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रांतपाल रोटे. राजिंदर खुराणा यांनी चोपडा रोटरी क्लबच्या विविध सेवा प्रकल्पांना भेट देऊन त्यांचे निरीक्षण केले. त्यांनी शहरातील काही प्रकल्पांचे उद्घाटन देखील केले. यामध्ये महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश होता कमलाबाई नेहरू मुलींच्या आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थिनींच्या अध्ययन आणि मनोरंजनासाठी एक अत्याधुनिक टीव्ही संच भेट देण्यात आला. या माध्यमातून विद्यार्थिनींना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांच्या ज्ञानात वृद्धी व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे विविध सार्वजनिक उत्सवांमध्ये तत्पर सेवा देणाऱ्या होमगार्ड बंधू-भगिनींसाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर बसण्यासाठी दोन मजबूत सिमेंटचे बाक भेट देण्यात आले. त्यामुळे त्यांना विरंगुळा मिळेल आणि त्यांच्या सेवेला आणखी बळ मिळेल. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवावी, यासाठी मेघुराया चौकात रोटरी क्लबच्या वतीने संत रोहिदास महाराज वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी विविध विषयांवरील पुस्तके आणि वाचकांसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. आरोग्य सेवा आणि सुविधा विस्तार हरताळकर हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या डायलिसिस सेंटरला तसेच यमुनाई फिजिओथेरपी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या रोटरी ऑर्थोपेडिक लायब्ररीला भेट देऊन प्रांतपालांनी तेथील सुविधांची पाहणी केली. त्यांनी या प्रकल्पांना अत्यंत उपयुक्त ठरवले आणि भविष्यात अधिकाधिक रुग्णांना त्याचा लाभ मिळावा, असे मत व्यक्त केले. पाणीपुरवठ्यासाठी मदतीचा हात चोपडा रोटरी क्लबच्या वतीने तालुक्यातील वडती येथील पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाला वॉटर कुलर भेट देण्यात आला. प्रांतपाल खुराणा आणि त्यांच्या पत्नी सौ. गिनी खुराणा यांच्या हस्ते हा वॉटर कुलर शाळेला सुपूर्द करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि थंड पाणी मिळण्यास मदत होईल. महिला सक्षमीकरण उपक्रम बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी चार महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. संगिता बाविस्कर, रिटा सपकाळे, निर्मला महाजन आणि शीतल पाटील या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. यामुळे त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक सक्षमता वाढेल. सामाजिक आणि विविध सेवा क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘रोटरी व्होकेशनल अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कारासाठी पुढील व्यक्तींची निवड करण्यात आली: सुनील वेडू पाटील (सफाईगार),प्रवीण नामदेव चौधरी (एस.टी. वाहक),विजय शिरसाट (वनरक्षक),भैय्या प्रल्हाद बाविस्कर (पाणीपुरवठा मजूर),रवींद्र धर्मराज पाटील (पोस्टमन),विजय मधुकर बच्छाव (पोलीस अमलदार),मनोज श्रावण पारधी (वाचमन, अमरधाम)सम्राट वाडे (व्यवस्थापक, पाणीपुरवठा विभाग) कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. डॉ. ईश्वर सौदाणकर, मानद सचिव भालचंद्र शिवाजी पवार, कोषाध्यक्ष प्रदीप पाटील (बा) आणि सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते. तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा, सचिव आणि सदस्यांचीही विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाची प्रस्तावना रोटे. डॉ. ईश्वर सौंदाणकर यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोटे. संजय बारी, विलास पी. पाटील आणि लीना पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर आभार प्रदर्शन भालचंद्र पवार यांनी केले. या समारंभामुळे चोपडा रोटरी क्लबच्या सेवाभावी कार्याचा गौरव झाला असून, भविष्यातही हा क्लब समाजसेवेच्या वाटेवर अविरत कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.