पाचोरा येथे गुणवंत अधिकारी दांम्पत्याचा सन्मान – मॉर्निंग वॉक ग्रुप, माऊली ज्येष्ठ नागरिक संघ व आर एम फंड हाऊसच्या संयुक्त विद्यमाने गौरव सोहळा संपन्न

0

पाचोरा, ता. २२ : यश ही केवळ मेहनतीची फळे असतात आणि जिद्द व परिश्रमाच्या जोरावर कोणतीही स्पर्धा जिंकता येते, याचा प्रत्यय पाचोरा येथील गुणवंत अधिकारी दांम्पत्याने दिला आहे. त्यांच्या यशाची दखल घेत मॉर्निंग वॉक व योगा ग्रुप, माऊली ज्येष्ठ नागरिक संघ आणि आर एम फंड हाऊस यांच्या संयुक्त

विद्यमाने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी पदावर निवड झालेल्या काटे दांम्पत्याचा गौरव हा सोहळ्याचा मुख्य उद्देश होता.
            रिंग रोड भागातील आर एम फंड हाऊसच्या सभागृहात आयोजित या सत्कार सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी लाभली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार प्रा. सी. एन. चौधरी यांनी भूषविले. यावेळी मॉर्निंग वॉक ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळू पाटील, मंडळ अधिकारी विजय येवले, सहाय्यक फौजदार भगवान बडगुजर, आदर्श शेतकरी बापू बडगुजर, शशिकांत पाटील, भास्कर पाटील, महिला व

बालकल्याण विभागाचे किशोर पाटील, चंद्रकांत शेलार, पीपल्स बँकेचे निवृत्त लेखापाल आर. आर. वाणी, अशोक बागड, निवृत्त नायब तहसीलदार भरत गायकवाड, निवृत्त कंडक्टर मंगलसिंग राजपूत, माजी सैनिक संजय पाटील, तावरे विद्यालयाचे प्राचार्य एस. एफ. पाटील, प्रा. डी. पी. वाणी, व्यापारी शाम खंडेलवाल, प्रा. एम. एस. महाजन, लक्ष्मीकांत मोराणकर, रोहित मिश्रा, के. एस. महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
         निवृत्त शिक्षक मनोहर काटे यांचे पुत्र नचिकेत काटे यांनी केंद्रीय स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत विभागीय लेखाधिकारी म्हणून निवड मिळवली आहे, तर त्यांच्या पत्नी मृणाल काटे यांची जलसंधारण अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासाची दखल घेत स्थानिक संस्था आणि नागरिकांनी त्यांचा भव्य सत्कार करण्याचा निर्णय घेतला. हा कार्यक्रम केवळ एक सत्कार सोहळा नसून, तो नव्या पिढीला प्रेरणा देणारा मार्गदर्शक प्रसंग ठरला.
       कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रा. सी. एन. चौधरी यांनी सांगितले की, ‘‘स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे केवळ वैयक्तिक यश नव्हे, तर संपूर्ण कुटुंब व समाजासाठी गौरवाची बाब आहे. काटे दांम्पत्याने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे, जे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.’’
      रोहित मिश्रा यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, ‘‘नचिकेत आणि मृणाल यांनी आपल्या कठोर परिश्रमातून हे स्थान प्राप्त केले आहे. अशा सत्कार सोहळ्यांमुळे युवकांना योग्य दिशा मिळते आणि समाजातील सकारात्मकता वाढते.’’
       मनोहर काटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ‘‘मुलाच्या आणि स्नुषेच्या यशामुळे मला अभिमान वाटतो. त्यांनी कष्ट आणि चिकाटीच्या बळावर हे यश मिळवले आहे. त्यांच्या प्रवासात संपूर्ण कुटुंबाने त्यांना पाठिंबा दिला आहे, आणि हा सत्कार आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे.’’
       सत्काराला उत्तर देताना नचिकेत काटे म्हणाले, ‘‘यश मिळवण्यासाठी मेहनत आणि संयम आवश्यक असतो. आम्ही दोघांनीही जिद्दीने अभ्यास केला आणि आजच्या दिवशी हा सत्कार आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्हाला मिळणाऱ्या या सन्मानामुळे पुढील कार्यासाठी अधिक प्रेरणा मिळेल.’’
     मृणाल काटे यांनी सांगितले, ‘‘मुलींसाठीही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे ही मोठी उपलब्धी आहे. समाजातील महिलांनी आपल्या शिक्षणावर आणि करिअरवर भर द्यावा, असे मी आवाहन करते. मला मिळालेल्या या सन्मानामुळे समाजातील इतर महिलांना प्रेरणा मिळेल.’’.                                           या गौरव सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मॉर्निंग वॉक व योगा ग्रुप, माऊली ज्येष्ठ नागरिक संघ आणि आर एम फंड हाऊस यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित मिश्रा यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी मनोहर काटे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि संयोजकांचे आभार मानले. हा सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला, आणि भविष्यात अनेक तरुणांना प्रेरणा देणारा महत्त्वाचा प्रसंग ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here