पाचोरा – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा पाचोरा यांच्या वतीने रविवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता श्री. शेठ मु. मा. महाविद्यालय येथे माजी न्यायाधीश दयाराम कोळी लिखित ‘बोभाटा’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहात आणि थाटात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाचोरा शाखेचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तथा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ उपस्थित होते. त्यांनी आपल्या हस्ते या


काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये पा.ता.सह. शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय ओंकार वाघ, व्हा. चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, प्रा. डॉ. वासुदेव वले (कार्याध्यक्ष, म.सा.प., पाचोरा), डॉ. अशोक कौतिक कोळी (जामनेर), प्रा. डॉ. शिवसांब कापसे (उप-प्राचार्य, श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय, पूर्णा), सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ. वर्षा बिरहारी चोंडे (सांगली), मा. श्री. मंगेश बिरहारी (दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, नागपूर), मा. सौ. स्वाती भास्कर सुर्यधन, मा. सौ. मंगला दयाराम कोळी, दगाजीआप्पा वाघ आणि सतीश उर्फ भोलाआप्पा चौधरी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या

स्वागत व सत्काराने झाली. विशेष म्हणजे, या प्रकाशन सोहळ्यात काव्यसंग्रहाचे लेखक मा. न्यायाधीश दयाराम कोळी आणि त्यांची पत्नी सौ. मंगला कोळी यांचा विशेष सत्कार माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पाचोरा वकील संघाच्या वतीनेही कोळी दांपत्याचा गौरव करण्यात आला. वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रविण पाटील, ॲड. एस. पी. पाटील, ॲड. मानसिंग सिद्धू, ॲड. अजय अहिरे, ॲड. शांतीलाल सैदाणे, ॲड. हरीभाऊ सपकाळे, ॲड. रविंद्र सपकाळे यांच्यासह अनेक वकील मंडळी यावेळी उपस्थित होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी केले. यानंतर कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठाचा आणि विशेष फलकाचा अनावरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. पुस्तक प्रकाशनानंतर लेखक दयाराम कोळी यांनी आपल्या मनोगतातून ‘बोभाटा’ काव्यसंग्रहाच्या निर्मितीमागची प्रेरणा उलगडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा कवितासंग्रह १९९० ते २००० या कालखंडातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतो. ‘बोभाटा’ हा तावडी बोलीभाषेतील काव्यसंग्रह आहे, जो विशेषतः पाचोरा, जामनेर आणि मलकापूर या भागांत प्रचलित आहे.
दयाराम कोळी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “लेखक, कवी, बुद्धिजीवी वर्ग आणि साहित्यिकांवर समाज प्रबोधनाची मोठी जबाबदारी असते. समाजाला योग्य दिशा देणे हे आमचे कर्तव्य आहे. माझा जन्म पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) या खेडेगावात झाला. बालपणापासून शेती व्यवसायाच्या सुख-दुःखांचा अनुभव घेतला. शेतकऱ्यांचे ओला-दुष्काळ, गारपीट, सरकारी धोरणांमुळे होणारे नुकसान, निर्यात-आयातीचे परिणाम यांचे साक्षीदार राहिलो. या साऱ्या वेदनांना कवितेतून अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.”
‘बोभाटा’ मधील कविता साध्या माणसांच्या वेदनांचे प्रतिबिंब आहे. ‘शाळेत जायची का मले हाऊस नाही?’ या कवितेतून एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाच्या मनातील व्यथा मांडली आहे. तसेच मुंबईतील सर्वसामान्य माणसाचे दैनंदिन जगणे ‘मुंब्रा अन वांद्रयाचे मिलन’ या कवितेतून प्रभावीपणे मांडले आहे. गारपीट झाल्यावर स्थगित होणाऱ्या विवाहाची व्यथा सांगणारी कविता – ‘आभाळाच उभं फाटलं, सके टाके मारणे जमणार नाही’ – अत्यंत हृदयस्पर्शी आहे. याशिवाय, ‘फिर्याद’ कवितेत पोलीस खात्याची स्थिती स्पष्ट केली आहे.
‘बोभाटा’ काव्यसंग्रहातील अनेक कविता सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करणाऱ्या आहेत. विशेषतः कोल्हापुरी बंधाऱ्याच्या संदर्भातील भ्रष्टाचाराचे विनोदी अंगाने सादरीकरण करणारी कविता विशेष गाजली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रकाशक अनुराधा पब्लिकेशन, नांदेड यांचे आभार व्यक्त करण्यात आले. प्रा. डॉ. सुनिता मांडोळे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी काव्यसंग्रह लेखक दयाराम कोळी यांचे सुपुत्र मंगेश बिरहारी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि सहभागी रसिकांचे मनःपूर्वक आभार मानले.
हा प्रकाशन सोहळा साहित्य प्रेमींसाठी एक पर्वणी ठरला. ‘बोभाटा’ या काव्यसंग्रहाद्वारे समाजातील विविध स्तरांवरील भावभावना कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे व्यक्त झाल्या आहेत. या प्रकाशन सोहळ्याने पाचोरा शहरातील साहित्य क्षेत्राला एक नवी उर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे.






ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.