जळगाव – जिल्हा सत्र न्यायालयातील वकिली व्यवसाय करणारे ॲड सचिन सुरेश चव्हाण यांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक पवार यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०८ (7)अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
त्यांच्या तक्रारीत म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पक्षकाराने एका महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणी चौकशीसाठी पाचोरा पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे, असे

त्यांना सांगण्यात आले. चौकशी दरम्यान, पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी तक्रारदार व त्यांच्या पक्षकार मित्रांसोबत उर्मट आणि बेकायदेशीर वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, पोलिसांनी अपमानास्पद वर्तन करत धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. “तुम्हाला कायद्याचे ज्ञान आहे का?”, “तुम्ही वकिलीचे शिक्षण घेतले असले तरी कायद्याचे शिक्षण घेतले आहे का?” अशा प्रकारच्या अपमानास्पद शब्दांत त्यांचा अपमान करण्यात आला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदाराने या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, त्यांनी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
यासंदर्भात माहिती प्रत्यक्ष मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालयासह, महाराष्ट्र पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण आणि पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांना पाठवण्यात आली आहे. यावर प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.